तीन विविध अपघातात ३० जाणांचा मृत्यू, चंद्रपुरात भीषण अपघात !

Foto
मुंबई : राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील एका अपघातात चालकाला डुलकी लागून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर ५ जण जखमी झाले. याशिवाय कर्नाटकातील चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग लागून १७ जणांचा मृत्यू झाल्याचे तर तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात भरधाव बसने दोन कारला चिरडल्याने ९ जणांचा मृत्यू झाला. या तीन अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३० झाली असून  जखमींवर उपचार चालू आहेत.
 
यातील चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण कार अपघातात तेलंगणा राज्यातील चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकाला लागलेली एक डुलकी या मोठ्या अनर्थाला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील काही लोक एका कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते. हा कार्यक्रम आटोपून सर्व जण कारने (क्र.  ०१  ११४४) आपल्या घराकडे निघाले होते. २५ डिसेंबर रोजी पहाटे १:३० वाजताच्या सुमारास त्यांची कार राजुरा-तेलंगणा मार्गावरील सोंडो गावाजवळ आली. यावेळी चालकाचा डोळा लागल्याने भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरील एका छोट्या पुलावरून थेट खोलगट खड्ड्यात कोसळली.

५ जणांची मृत्यूशी झुंज

हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालकासह इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.