मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली आहे. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्स्प्रेस पुढे जाऊच शकलेली नाही. या एक्स्प्रेसमध्ये ७०० प्रवासी अडकले असून एनडीआरएफच्या चार तुकड्या या सगळ्यांच्या सुटकेसाठी या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने नौदल आणि हवाई दलाला प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी मदत पाठवण्याची विनंती केली होती. त्यानंतर नौदलाने प्रवाशांच्या बचावासाठी आपली चॉपर्स पाठवली आहेत. नौदल आणि हवाई दलाच्या मदतीने आतापर्यंत ३०० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, नौदलाची आठ बचाव पथके या ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. तसेच यामध्ये तीन डायव्हिंग टीमसह बचाव सामग्री, इन्फ्लॅटेबल बोट्स आणि लाइफ जॅकेट्सदेखील पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नौदलाचा पश्चिम विभाग या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच आवश्यक पुरग्रस्त भागांमध्ये आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी नौदल राज्य प्रशासनाच्याही संपर्कात असल्याची माहिती नौदलाने दिली आहे.