नोकरीच्या आमिषाने ३९ लाखांचा गंडा; संस्थाचालक महिलेवर गुन्हा दाखल

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ओळख वाढवून विश्वास संपादन करत तुमच्या मुलाला आणि ओळखीच्या इतरांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शिक्षण संस्थाचालक महिलेने सुमारे ३९.८५ लाख रुपये उकळले. तसेच तिने संबंधितांना २०१२ ते २०२६ असे तब्बल १४ वर्षे फिरविले. याप्रकरणी ज्ञानसुधा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. बाळासाहेब पाटील निवासी मूकबधीर विद्यालयाच्या संस्थाचालक संगीता बाळासाहेब आव्हाळे (रा. प्लॉट नं ४७, गट नं १३९, बीड बायपास) हिच्याविरुद्ध सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ती पसार झाल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.
विष्णू गबाजी शहाणे (५८, रा. हरिज्योती पार्क, सातारा परिसर) हे फिर्यादी आहेत. ते नवजीवन मतिमंद मुला-मुलींची विशेष शाळा, नागपूर येथून वसतिगृह अधीक्षक पदावरून रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांची २०१० पासून आरोपी संगीता आव्हाळे हिच्यासोबत ओळख आहे. तिने टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून २०१४ पर्यंत १० लाख ५ हजार उकळले. पैसे परत मागितल्यावर तिने तुमच्या मुलाला शाळेवर कला शिक्षकाची नोकरी लावून देते म्हणून त्यांच्याकडेच पैशांची मागणी केली. शहाणे यांनीही तिच्यावर विश्वास ठेवून २० लाख ३५ हजार रुपये दिले. संगिताने शहाणे यांचा मुलगा अभिषेक यांना कला शिक्षक पदाची ऑर्डर दिली. मात्र, अनुदान नाही म्हणून हजर करून घेतले नाही. आरोपी संगीता आव्हाळे हिने शहाणे यांच्या मध्यस्थीने अनेकांकडून पैसे उकळले.