छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे . त्यामुळे गोदाकाठच्या गावात पाणी शिरले आहे . पुराच्या पाण्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे . बीड जिल्ह्यातील 44 गावांना या पाण्याचा फटका बसला असून नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे . ज्या गोदापट्ट्याने आजपर्यंत सर्वांना जगवले त्यांच्यावरच आता उपासमारीची वेळ आली आहे. सरकारी मदतीची वाट बघताना नागरिकांचा धीर खचत आहे. आम्हाला जेवायला नको पण जनावरांना चारा पाठवा अशी अर्जव शेतकरी करीत आहेत.
गेवराई तालुक्यातील साळवेश्वर, गुळज, नागझरी या गावांमध्ये पाणी शिरलं आहे . त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी स्थलांतर केले आहे .मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतला आहे . गावात पुराचे पाणी शिरले आणि नागरिकांना त्यांचे राहते घर सोडावे लागले. रात्रीपासून झालेल्या पावसाने आणि विसर्गाच्या पाण्याने गेवराई तालुक्यातील गावागावांमध्ये पाणी शिरलं. गरजेपुरत्या वस्तू बांधून घेत नागरिकांनी सकाळी घर सोडलं. जागा मिळेल तिथे नागरिक आश्रयाला थांबले आहेत. प्रशासनाची मदत अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही.
नदीकाठच्या नागरिकांना दरवर्षीच पुराचा धोका असल्याचे गावातील वयोवृद्ध महिलेने सांगितले. नाथसागरातून पाणी आलं की रात्र दिवस बघावं लागत नाही. घर तातडीने सोडावं लागतं. अशा पद्धतीने बाहेर पडायची आमची तिसरी वेळ आहे असे स्थलांतर केलेल्या एका महिलेने सांगितले. घर पाण्यात जातात. आयुष्यभर जमा केलेली पुंजी क्षणार्धात पाण्यात वाहून जाते. लेकरा बाळांचे हाल होतात. पुस्तक दप्तर भिजून गेली आहेत. कुणी खायला आणून देतो कोणी हातात घेऊन तसेच पळतय. आम्ही रात्री एक वाजता बाहेर पडलो. पांघरायला घेऊन आले आहे असे एका वृद्ध महिलेने सांगितले.
गावाला पुराचा वेढा, नागरिकांनी रात्रीतून गाव सोडले
एकीकडे धरणाचा विसर्ग तर दुसरीकडे रात्रभर कोसळणारा बेफाम पाऊस. गेवराई तालुक्यातील सावळेश्वरसह 44 गावांना पुराचा फटका बसला आहे. गावात पाणी शिरल्यामुळे आम्ही दहा वाजता गाव सोडलं. यात प्रशासनाची कुठलीही मदत आम्हाला मिळालेली नाही. सगळ्यांचे फोन बंद आहेत. इथं माणसांप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झालाअ ाहे. लोक जीवावर उदार होऊन जनावराला चारा आणतायत. लोकांना खायला मिळत नाहीये .जे सोबत आणलं होतं ते संपलं . लोक तेवढ्या पाण्यातून पुन्हा गावात जाऊन काही शिल्लक असलेलं अन्न ते घेऊन येत आहेत असं एका तरुणाने सांगितले .
चाऱ्याच्या शिफारशीला शेतकरी वैतागले !
गावातील लोकांना रात्री तीन वाजल्यापासून बाहेर काढत आहोत. तुम्ही शासनाची त्यात एकही चक्कर नाही . एकदा तहसीलदार येऊन गेले त्यांनाही आम्ही सांगितले की माणसाला अन्न दिले नाही तरी चालेल जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा . आता सकाळी फोन केला तेव्हा ते म्हणतात आम्ही सरकारकडे जनावराच्या चाऱ्याची शिफारस करतो . ज्या गोदापट्ट्याने हा सगळा परिसर जगवला .त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . एका जिनिंग मध्ये नागरिकांचे स्थलांतर करण्यात आला आहे .पुराना वेढलेल्या गावांपासून दीड किलोमीटर लांब जिनिंग असलं तरी आता दुसऱ्या बाजूने पाणी येण्याची शक्यता असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.