जिल्ह्यात मध्यम प्रकल्पासह ४९ लघु प्रकल्प कोरडेठाक

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : सव्वा दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यातील ९१७ प्रकल्पांत ५२.६८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या धरणांमुळे पाणीसाठ्यात वाढ दिसत असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांत मात्र अत्यल्प पाणीसाठा आहे. 

एका मोठ्या आणि मध्यम प्रकल्पासह ४९ लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. ३१२ लघु आणि मध्यम प्रकल्प जोत्याखाली असल्यामुळे पाणीसाठ्याचा प्रश्न कायम आहे.
मराठवाड्यातील मोठ्या १० धरणांत सर्वाधिक साठा आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा नाही. विभागातील ७८० लघु प्रकल्पांत जेमतेम २०.१२ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील ४७प्रकल्प पूर्ण कोरडे पडले आहे. 

२९७ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर २१३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ७६ मध्यम प्रकल्पांत २२.६९ टक्के साठा असून, एक प्रकल्प कोरडा आहे. एकूण १५ प्रकल्प जोत्याखाली आणि ३८ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मोठ्या ११ प्रकल्पांतील सिना कोळेगाव प्रकल्प कोरडा आहे.

इतर दहा धरणांत ६९. ३८ टक्के एवढा पाणीसाठा आहे. चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात सद्यस्थिती ९४ टक्के एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, उद्योगांसाठी पाणी आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.

येलदरी ६२ टक्के, सिद्धेश्वर ३२, माजलगाव २३, मांजरा १५, उर्ध्व पैनगंगा ६८, निम्न तेरणा २५, निम्न मनार ५९, विष्णुपुरी ९९ आणि निम्न दुधना ६४ टक्के असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ५६.६६ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील ३५ बंधाऱ्यांत ६.७८ टक्के साठा उपलब्ध आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील ९९ प्रकल्पांत ३३ टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

-- ५० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात -- 
छत्रपती संभाजीनगर: उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे यंदा खरीप हंगामातील पेरण्यांवर विपरित परिणाम झाला असून, जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठेही पाऊस नसल्यामुळे पिके करपली आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या ९ दिवसांतही निराशा झाल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद संकट घोंगावत आहे. पावसाळ्याचा चौथा महिनाही कोरडा चालल्याने जिल्ह्यातील तब्बल ५० हजारहून अधिक हेक्टरवरील पेरणी रखडलेली आहे. ५० टक्के क्षेत्रावर कशीबशी पेरणी झाली असली तरी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्यामुळे शेतकरी चिंतातूर असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ८१ हजार ६०९ हेक्टर आहे. यापैकी आतापर्यंत ५ लाख १५ हजार २३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, आजअखेर ५० हजारहून अधिक हेक्टर क्षेत्र पेरणीविना आहे. 

पावसाअभावी उगवून आलेली. पिके सुकून भीषण दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळा संपण्याच्या बेतात असून, कुठेही दमदार पाऊस नसल्यामुळे खरीप तर गेलेच, रब्बी हंगामही धोक्यात आहे.