अरे बापरे जिल्ह्यात ४९३ बोगस डॉक्टर, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे

Foto


औरंगाबाद- जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील तब्बल ४९३ बोगस डॉक्टरांचा शोध घेतला आहे. याचा अहवाल जिल्हा परिषदेला दाखलही केला, परंतु या बोगस डॉक्टरांवर पुढे काय कारवाई केली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

 

जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी जिल्ह्यातील एकूण खासगी रुग्णालयांची संख्या व त्यात कार्यरत बोगस डॉक्टर कितीज्यांनी बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट १९४९ अंतर्गत नोंदणी केलेली नाही. तरीसुद्धा रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीविताशी खेळत आहेत अशां डॉक्टजांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील खासगी रुग्णालयांची संख्या तसेच बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट १९४९ अंतर्गत वैद्यकीय व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र न घेतलेल्या बोगस डॉक्टरांविषयीचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केला. 

 

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी या बोगस डॉक्टरांवर स्वतः कारवाई न करता उलट तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनीच कारवाई करावीअसे फर्मान सोडले. पुढे त्यांनी या डॉक्टरांवर कारवाई केली काकेली असेल तर किती डॉक्टरांवर कारवाई केली याचे उत्तर मात्र डॉ. खतगावकर यांच्याकडे नव्हते. काही दिवसांनी त्यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर जालन्याहून बदलून आलेले डॉ. अमोल गीते हे तरी या बोगस डॉक्टरांवर कारवाई करून रुग्णांच्या जीवनाशी खेळणार्‍या डॉक्टरांवर चाप ओढतात काय याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

 

तालुकानिहाय बोगस डॉक्टर 

औरंगाबाद - ९२

फुलंब्री - ९५

गंगापूर - ७३

पैठण - ५०

वैजापूर - ५५ 

सोयगाव - १७ 

कन्‍नड - ४२

सिल्‍लोड - ७० 

खुलताबाद - ०० 

  एकूण    - ४९३