जीप - दुचाकी अपघातात ५ जण जखमी

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : धुळे - सोलापूर महामार्गावर शहराजवळ असलेल्या भारत पेट्रोलपंपाजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता थार जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चेंबूर (मुंबई) येथील एकाच कुटुंबातील तिघांसह दुचाकीवरील दोन तरुण असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले. 

अपघाताचा हा सर्व थरार पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. थार जीपमधील जखमी (रा. चेंबूर, मुंबई) हितेश सक्रे (४२), प्रिया हितेश सक्रे (३५) आणि रुजूल हितेश सक्रे (१५) दुचाकीवरील जखमी मुक्तार शब्बीर शेख (३०, रा. मक्रणपूर) आणि दीपक कडूबा मोरे (२५, रा. दाभाडी) असे अपघातात झालेल्या जखमींची नावे आहेत.

मुंबईतील चेंबूर येथे राहणारे सक्रे बीएच ०२३९) उज्जैन येथे देवदर्शनासाठी कुटुंबीय त्यांच्या थार जीपने (एमएच २४ जात होते. कन्नडजवळील साखर कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या पेट्रोलपंपावरून जात असताना, अचानक विरुद्ध दिशेने आलेल्या एका दुचाकीने (क्रमांक एमएज २ एएस ८६७३) थारला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, थार जीपने डिवायडर तोडून रस्त्यावरून तब्बल तीन ते चार वेळा उलटून अनियंत्रित झालेली ही गाडी शेवटी पेट्रोल पंपावरील हवा भरण्याच्या शेडमध्ये जाऊन धडकली आणि थांबली. या अपघातात थार गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दुचाकीवरील दोन्ही जखमींना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केले आहे.