वैजापूर, (प्रतिनिधी) : शहरातील स्टेशन रोड येथील म्हसोबा चौकात मंगळवारी सायंकाळी भरधाव ट्रकच्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरच्या दिशेने जाणारा भरधाव भुसारमाल भरलेला ट्रक उभ्या असलेल्या हायवा ट्रकला धडकला. जोरदार धडक बसल्याने हायवा ट्रक पुढे गेल्याने समोर बसलेले भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते यांचे दुकान व एक दुचाकी हायवा खाली दबली गेली. त्याच
वेळेस ट्रकच्या मागून येणारा टेम्पोचा वेग अनियंत्रित होऊन डिव्हायडरवर चढला.
त्यामध्ये टेम्पोच्या चालकाला डोक्याला व छातीला मार लागला. ट्रकच्या धडकेमुळे चौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी धाव घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या अपघातामध्ये भाजीपाला व फळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित ट्रकचालक हा नशेच्या अवस्थेत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे.














