छत्रपती संभाजीनगर : दिवाळी पाडवा म्हटले की सोने-चांदी खरेदीसोबतच नवीन वस्तू आणि मालमत्ता खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर यंदा शहरात घरखरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांनी पाडव्याचा मुहूर्त साधण्याची तयारी केली आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत घरखरेदीच्या व्यवहारात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर पाचशे घरांची बुकिंग होण्याची अपेक्षा क्रेडाईचे अध्यक्ष संग्राम पटारे यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केली.
शहराचा विस्तार झपाट्याने होत असून विविध भागांत नवीन गृहप्रकल्प उभे राहत आहेत. विशेषतः सिडको, हडको, बीड बायपास, सातारा परिसर, देवळाई, चिकलठाणा, वाळूज आणि परिसरातील नवीन वसाहतींमध्ये घरखरेदीसाठी ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. जागा तसेच बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमध्येही ग्राहकांकडून चौकशी केली जात आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर घराची बुकिंग करण्यासाठी अनेकांनी आधीपासूनच नियोजन केले आहे. दरम्यान, शहर आणि परिसरातील जमिनींच्या किमती सातत्याने वाढत आहेत. विकसित भागांमध्ये भूखंड मिळविण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र बंगला किंवा फ्लॅट किंवा प्लॉट खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यातही वाहनतळ, उद्यान, सुरक्षितता, पाणीपुरवठा आणि इतर सुविधांचा विचार करून गृहप्रकल्पांची निवड केली जात आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसह स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणार्या तरुणांकडूनही घरखरेदीसाठी पुढाकार घेतला जात आहे.













