छत्रपती संभाजी नगर, (सांजवार्ता ब्युरो): एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने नारेगाव परिसरातून ५३ किलो ४४१ ग्रॅम वजनाचा गांजा (कॅनबीज वनस्पती) आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीची फियाट कार जप्त केली. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले.
नारेगाव परिसरात एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला. संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी तत्काळ कार थांबवून तपासणी केली. वाहनामध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी विदेश सुरेश माचरे (वय ३८, रा. भाटनगर, नारेगाव) यास ताब्यात घेतले. त्याने हा गांजा कुठून आणला आणि कुणाला तो विक्री करणार होता, याचा तपास पोलिस करत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्यासह विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक भरत पाचोळे, कैलास लहाने, पोहेकॉ. संतोष सोनवणे, संजय नंद, अंमलदार प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, अरविंद पुरी, रतन नागलोत आदींनी केली. या प्रकरणात आणखी चार संशयितांची नावेही समोर आली. त्यातील एक ओडिशातील, दुसरा जळगाव येथील आहे. शिवाय अन्य दोघे आहेत. पोलिसांनी या चारही संशयितांचे मोबाइल नंबर मिळवले असून, त्याआधारे त्यांचा शोध सुरू आहे.











