मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यातच टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आला असतानाच एका विद्यापीठात बनावट डिग्री सर्टिफिकेट देणारं रॅकेट उघडकीस आलं आहे. यावरून शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत हे आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक पोस्ट शेअर करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं की, ङ्गङ्घमहाराष्ट्रात शिक्षणाच्या आय चा घो झाला आहे. साधारण २००० सरकारी शाळा निधी अभावी बंद पडल्या आहेत. विद्यापीठात आणि शालेय बोर्डात बोगस डिग्री आणि आणि मार्कशीट्सचा बाजार भरला आहे. राज्यात शिक्षणाची अत्यंत खराब अवस्था असतानाच शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शासनाच्या धोरणामुळे खासगी संस्थाचालकांचे कंबरडे मोडले असतानाच स्वयंअर्थसहाय्यित शाळेच्या अंतिम मंत्र्याच्या मान्यतेला तब्बल पाच ते दहा लाख रुपये घेऊन मान्यता मिळत आहे. तसेच तुकडी वाढीसाठी आठ लाख रुपये व शाळेच्या इरादा पत्रासाठी पाच लाख रुपये दिल्याशिवाय मंत्री कार्यालयात मंत्र्यांचे ओएसडी महाशय उभा ही करत नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच पैसे घेऊनही सहा-सहा महिने संस्था चालकांना मंत्री कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचं कळतं आहे.
मी मंत्री महोदयांचा पाहुणा असल्याने मला कोणीही काही करू शकत नसल्याचा अविर्भाव या ओएसडीकडे ठासून भरलेला दिसून येतो. संस्थाचालकांना एक शाळा उभा करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च येत असताना शालेय शिक्षण विभागाच्या व्यवस्थेकडून सर्व अधिकारी व मंत्र्यांच्या मान्यतेसाठी तब्बल ५० लाखाचा खर्च येत असल्याने शाळेच्या संस्था कशा उभा करायचा असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहेफफ, असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.