साजवार्ता
Page No.: 3 Date: 25/10/2026
गावठी पिस्तुलांची अवैध विक्री करणाऱ्या ६ उच्चशिक्षितांना बेड्या
४ पिस्तूल, ११ काडतुसे जप्त; सिडको पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मध्य प्रदेशातून गावठी बनावटीची पिस्तूल आणून शहरात ३८ ते ५० हजार रुपयांना विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपी पिस्तूल आणि काडतुसे वेगवेगळ्या गुप्त ठिकाणी लपवून ठेवत. विशेष म्हणजे अटक केलेले आरोपी उच्चशिक्षित असून त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
शिवा अंबादास सुरे (वय २५, सुरेवाडी), सुमित सुनील विसपुते (सुरेवाडी), सत्यम भास्कर चाटे (वय २३, मयूर पार्क), अर्जुन किशोर लिंगायत (नवजीवन कॉलनी), श्रीकांत सतीश शिखरे (वय २४, मयूर
पार्क) आणि विशाल राजू भोसले (वय २४, एसटी कॉलनी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी
दिली. सुरेवाडीतील एक तरुण पिस्तूल व दोन काडतुसे बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे आणि उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांच्या पथकाने शिवाला ताब्यात घेतले. त्याने पिस्तूल मित्र विसपुते याच्या
घरी लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तेथून पिस्तूल व दोन काडतुसे जप्त केली. शिवाच्या चौकशीत हे शस्त्र सत्यम आणि अर्जुन यांच्याकडून घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी सत्यमच्या ताब्यातून
आणखी एक पिस्तूल जप्त केले, तर अर्जुनने जाधववाडीतील मोंढा परिसरातील एका झाडाखाली लपवून ठेवलेली दोन पिस्तुलेही पोलिसांनी हस्तगत केली. ही कारवाई हवालदार मंगेश पवार, सहदेव साबळे, अमोल अंभोरे, नरेश भोंडे आणि अतुल
सोळुंके यांच्या पथकाने केली.
संशयित उच्चशिक्षित
अटकेतील तरुण उच्चशिक्षित असून, त्यात शिवा सुरे, अर्जुन लिंगायत आणि श्रीकांत शिखरे यांनी बीसीएस, सुमित विसपुतेने बीएस्सी (इन्फॉर्मे टिक्स), तर सत्यम चाटेने बीकॉमचे शिक्षण घेतले. शिवा हा कंत्राटदार असून इतर आरोपी खासगी नोकरी करतात. श्रीकांतविरुद्ध सिडको, जिन्सी आणि मुंबईतील विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर शिवा आणि विशाल यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. शहरात यापूर्वी किती पिस्तुले विकली गेली आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















