छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): यंदा मराठवाड्यात चांगला पाऊस झाला आहे, असे असले तरी कडक उन्हाळा सुरू झाल्याने बहुतांश भागात पाणी टंचाईच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असतानाच दुसरीकडे पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने प्रशासनाकडे पाण्याच्या टँकर्सची मागणी होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीड आणि धाराशिव हे दोन जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यांत पाण्याचे टँकर्स सुरू होण्यास सुरवात झाली आहे. विभागातील छत्रपती संभाजीनगरसह, लातूर, जालना या जिल्ह्यांतील तहानलेली ६३ गावे आणि २६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामध्ये चार शासकीय, तर १०२ खासगी टँकरचा समावेश
आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू होताच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो. पाण्याचे नियमित स्रोत आटलेल्या गावांना टँकरची गरज पडते. गेल्या उन्हाळ्यात निम्मा मार्च महिना संपण्यापूर्वीच विभागात अनेक भागांत टँकरची मागणी झाली होती. गतवर्षी
२० ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यांतील तहानलेल्या एकूण १४२ गावे व २४ वाड्यांना मिळून २१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. यंदा २९ एप्रिल २०२६ अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४५ गावे आणि १२ वाड्यांना मिळून ७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर जालना जिल्ह्यातील १६ गावे व १३ वाड्यांना दोन शासकीय आणि ३१ खासगी अशा २९ टँकरद्वारे, तर लातूर जिल्ह्यातील दोन गावे आणि एका वाडीला दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर मराठवाड्यातील अन्य उर्वरित जिल्हे सुदैवाने अद्याप टँकरमुक्त असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात नमूद आहे.
१५४ विहिरींचे अधिग्रहण
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव वगळता अन्य जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. २९ एप्रिलच्या अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण १५४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६१, जालना २७, परभणी चार, हिंगोली २१, नांदेड १९, लातूर जिल्ह्यातील २२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.











