मराठवाड्यात ८ महिन्यांत ६५३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

Foto
अपुरा पाऊस; पाठीशी संकटे आणि हतबलता ! सर्वाधिक १४९ आत्महत्या बीडमध्ये
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अपुरा पाऊस, खरीप पिकांना बसलेला मोठा फटका आणि तीव्र पाणीटंचाईमुळे आधीच संकटात सापडलेल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येची भीषण आकडेवारी समोर आली आहे. चालू वर्षाच्या मागील आठ महिन्यांत या भागात ६५३ शेतकऱ्यांनी नैराश्यातून मृत्यूला कवटाळले असून, यात सर्वाधिक १४९ घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत.
मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. यंदा मराठवाड्यात सर्वदूर अपेक्षित पाऊस नाही. सध्या पाणी टंचाईचा प्रश्न
निर्माण झाला आहे. एकूणच कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही. परिणामी, बिघडलेली आर्थिक गणिते,
अशा या चक्रात अन्नदाता सापडला आहे. या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत ६५३ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यात सर्वाधिक म्हणजे १४९ घटना बीड जिल्ह्यात घडल्या असून त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३८ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मराठवाड्यात तब्बल १ हजार १३१ शेतकयांनी आत्महत्या केल्या.
जिल्हानिहाय आत्महत्या
संभाजीनगर १३८, जालना ६१, परभणी ४५, हिंगोली ४४, नांदेड ८२, बीड १४९, लातूर ४६, धाराशिव ८८, एकूण ६५३
२३२ प्रकरणे प्रलंबित
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत ३६३ प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली आहेत. २३२ प्रकरणे चौकशी वा निर्णयाकरिता प्रलंबित आहेत. तर ५८ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions