छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : २००० मध्ये बीएसएनएलच्या दूरध्वनी बिल छपाई कंत्राटात झालेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहारात दीड दशकानंतर न्यायालयाने न्याय दिला आहे. सार्वजनिक सेवकांनी पदाचा गैरवापर करत खासगी कंपनीला लाभ करून दिल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय. के. कुलकर्णी यांनी माजी महाव्यवस्थापकासह सात आरोपींना दोषी ठरवत कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.
माजी महाव्यवस्थापक दर्शनकुमार सीताराम खन्ना, संचालक (वित्त) गणपत दानिश एंटरीनाथ भोकारे, शफकत भगत, रोहन सुरेश वैद्य, कार्तिक आर. के. शाहनी, रोहित मस्तराम गुप्ता अशी शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दूरध्वनी बिल छपाई कंत्राटात झालेल्या गैरव्यवहारात दोषी आढळले होते. माजी महाव्यवस्थापक दार्शनकुमार खन्ना यांना विविध कलमांखाली दोन वर्ष सक्तमजुरी आणि एकूण २ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच संचालक (वित्त) भोकारे याला दोन वेगवेगळ्या कलमान्वये दोन वर्ष सक्तमजुरी आणि एकूण एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.
फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा
२००० मध्ये बीएसएनएल औरंगाबाद कार्यालयात दूरध्वनी बिल छपाईसाठी कंत्राट देताना गंभीर अनियमितता झाल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले. तत्कालीन वरिष्ठ अधिकार्यांनी झेरॉक्स मॉडिकॉप लिमिटेडच्या अधिकार्यांशी संगनमत करून निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केला. या गैरव्यवहारातून संबंधित खासगी कंपनीला आर्थिक फायदा झाला, तर बीएसएनएलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या तपासादरम्यान बीएसएनएलच्या माजी महाव्यवस्थापकासह संबंधित अधिकार्यांनी कंत्राट देण्यासाठी बेकायदेशीर मोबदला स्वीकारल्याचे पुरावे समोर आले. महाव्यवस्थापक दर्शनकुमार खन्ना, संचालक (वित्त) गणपत भोकारे तसेच इतर अधिकार्यांनी पदाचा गैरवापर करून लाच स्वीकारल्याचे विशेष सरकारी वकील अरविंद कुमार यांनी न्यायालयात सिद्ध केले. सुनावणी अंती न्यायालयाने हा प्रकार केवळ नियमभंग नसून जाणीवपूर्वक केलेली फसवणूक असल्याचा ठपका ठेवत आरोपींना दोषी ठरवले. निकालामुळे सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारावर कडक कारवाईचा संदेश गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
कट रचल्याप्रकरणी शिक्षा
दर्शनकुमार खन्ना, गणपत भोकारे, दानिश भगत, रोहन सुरेश वैद्य, कार्तिक शाहनी, रोहित गुप्ता यांना कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. प्रत्येक आरोपीस सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरी भोगावी लागेल. फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी दानिश भगत, रोहन वैद्य, कार्तिक शाहनी, रोहित गुप्ता यांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरी भोगावी लागेल.










