हैद्राबाद : आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवर नक्षलवाद्यांच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मोठे यश मिळाले आहे. मारेडुमिल्ली आणि जीएम वालसा जंगल परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश चंद्र लड्डा यांनी ही माहिती दिली.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्रमुख नाव मेटुरू जोगाराव उर्फ टेक शंकर याचे आहे. हा आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीच्या तांत्रिक शाखेचा प्रमुख होता. सुरक्षा यंत्रणांच्या मते, टेक शंकरनेच मागील काही वर्षांत छत्तीसगड व आंध्र-ओडिशा क्षेत्रात लँडमाइन व हल्ल्यांचे डिझाइन आणि अंमलबजावणी केली होती. शस्त्रनिर्मिती, संचार प्रणाली, स्फोटकांची रचना या बाबतीत त्याला विशेष कौशल्य असल्याने त्याला संघटनेचा टेक्निकल प्रमुख मानला जात असे.
सीमावर्थी भागात वाढता नक्षलवाद
गेल्या काही महिन्यांत आंध्र-ओडिशा सीमाभागात नक्षलवादी हालचाली वाढल्याचे इनपुट मिळत होते. नक्षल गटांनी जंगलात नवीन अड्डे उभारणे, जुन्या कॅडरला सक्रिय करणे आणि छत्तीसगडच्या दिशेने येणाऱ्या गटांना प्रवेश देण्याच्या हालचाल सुरू होती. या पार्श्वभूमीवर ग्रेहाउंड्स आणि इतर सुरक्षा पथकांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन सुरू केले. त्याच मोहिमेचा परिणाम म्हणून बुधवारी सकाळी तीव्र चकमक झाली.
लड्डा यांनी सांगितले की, 17 नोव्हेंबरला मारेडुमिल्ली परिसरात झालेल्या मोठ्या कारवाईत कमांडर हिडमा याच्यासह सहा नक्षलवादी ठार झाले होते. त्या कारवाईत मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी सीमेवरील संपूर्ण नेटवर्कवर विशेष लक्ष केंद्रित केले आणि विविध जिल्ह्यांत सातत्याने ऑपरेशन्स राबवले. याच कारवाईदरम्यान, आज सात नक्षलवादी ठार झाले आहेत.
राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
गेल्या काही दिवसांत एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, कोनसीमा आणि एलुरु जिल्ह्यांतून एकूण 50 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या अटकांमध्ये केंद्रीय समिती, राज्य समिती, एरिया कमिटी आणि प्लाटून स्तरावरील महत्त्वाच्या सदस्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोर कॅडर एकाचवेळी पकडले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी 45 रायफल/बंदुका, 272 जिवंत काडतुसे, 2 मॅगझीन, 750 ग्रॅम वायर ( साठी वापरली जाणारी), तांत्रिक उपकरणे आणि स्फोटकांसंबंधित इतर दस्तऐवज जप्त केली आहेत.
सीमेवर हाय अलर्ट
सध्या छत्तीसगडमधील वाढत्या दबावामुळे काही नक्षल गट आंध्र प्रदेशात स्थलांतर करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच दलांनी संपूर्ण परिसरात सखोल सर्च ऑपरेशन्स चालू ठेवले आहेत. या कारवाईमुळे माओवादी संघटनेच्या तांत्रिक पायाभूत संरचनेला मोठा फटका बसल्याचे सुरक्षा यंत्रणा मानतात. तसेच, सीमेवर क्षेत्रातील वाढती नक्षलवादी हालचाल रोखण्यासाठी ही एक निर्णायक आणि धोरणात्मक यशस्वी कारवाई असल्याचे मानले जात आहे.