नवी दिल्ली : नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज ३१ व्या दिवशी धक्कादायक वळण मिळाले. दिल्ली पोलिसांनी आंदोलक जंतरमंतर सोडून बाहेर पडू नयेत म्हणून तिथेच संपूर्ण फिल्डिंग लावली होती. मात्र, पोलीस प्रशासन जंतरमंतरवरच लक्ष ठेवून गाफील राहिले आणि तिकडे कॉकरोच जनता पार्टीच्या सुमारे ७५ हजार आंदोलकांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देत थेट संसद भवनाच्या परिसरात धडक मारली. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७५ हजारांचा हा भलामोठा जमाव संसदेच्या परिसरात पोहोचल्याने दिल्ली पोलिसांची अक्षरशः पळापळ झाली आहे.
संसदेचे गेट बंद, सुरक्षारक्षकांनी रोखल्या बंदुका
जंतरमंतरवरून कोणालाही बाहेर पडू न दिल्याने पोलीस निश्चिंत होते, परंतु देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या एका मोठ्या गटाने थेट संसदेच्या दिशेने कूच केले. आंदोलक संसदेपासून अवघ्या १५० मीटर अंतरावर येऊन पोहोचताच सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आली.
संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी तातडीने धाव घेत विजय चौकाकडील संसदेचे मुख्य गेट कुलूप लावून बंद केले. आंदोलकांनी घुसखोरी करू नये म्हणून सुरक्षारक्षक हातात बंदुका रोखून आणि वॉटर कॅननचे पाईप्स घेऊन गेटवर तैनात झाले आहेत.
बॅरीकेडिंगवर चढले आंदोलक; अश्रूधुराच्या नळकांड्या अन् दगडफेक
संसद भवनाकडे जाणार्या मार्गावर पोलिसांनी लादलेली बॅरिकेड्सची मोठी फळी तोडण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. अनेक विद्यार्थी बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी करू लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या झटापटीदरम्यान काही आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सध्या दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
धर्मेंद्र प्रधान तडकाफडकी अमित शाहांच्या भेटीला
दरम्यान, दिल्लीत पोलिसांचा बंदोबस्त भेदून आंदोलक थेट संसदेच्या दारात पोहोचल्याने केंद्र सरकारमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, वादाच्या भोवर्यात सापडलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे तातडीने गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सध्या अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू असून, संसदेच्या सुरक्षेवर आलेला ताण आणि वाढता जनक्षोभ पाहता धर्मेंद्र प्रधान आपल्या शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.