तिरुचिरापल्ली : तामिळनाडूमध्ये रविवारी झालेल्या एका भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर संपूर्ण तिरुचिरापल्ली परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मुसिरी जवळ रविवारी व्हॅन अनियंत्रित होऊन झाडाला धडकली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. थुरैयूर-मुसिरी रस्त्यावर जंबुनाथपुरमजवळ हा अपघात झाला. व्हॅनची धडक इतकी जोरदार होती की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारावेळी ३ जणांचा मृत्यू झाला. तर २ जणांवर उपचार सुरू आहेत.
रायगडमध्येही पिकनिकवरून येताना कार कोसळून दोघांचा जागीच मृत्यू; वाहनाचा चेंदामेंदा
दरम्यान रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. महाड मधील बिर्ला ओपस कंपनीत काम करणारे चौघेजण श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या वॅगनआर कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली.
स्थानिक प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाड मधील कामगार मनन पांचाळ, साईराज भोसळ, अभिषेक देवघरे आणि अर्यन शिंदे हे चौघेजण श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी गेले होते. श्रीवर्धनहून पुन्हा परत येत असताना म्हसळा बायपासच्या तीव्र उतारावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. वेगात असलेली कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली अन् चेंदामेंदा झाली.
हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चुराडा झाला. या दुर्घटनेत मनन पांचाळ आणि साईराज भोसळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अभिषेक देवघरे आणि अर्यन शिंदे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. दोन होतकरू तरूणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.