चंबा : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. येथे झालेल्या एका रस्ते अपघातात छत्तीसगडमधील सात पर्यटकांसह आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. २९ मे रोजी मध्यरात्री चुरा उपविभागातील बैरागढ-सच पास-किलाड रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणारी एक एर्टिगा कार खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. अपघातापासून सर्वजण बेपत्ता असून त्यांच्या जगण्याची आशा कमी आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान, कारमधील कोणीही वाचण्याची शक्यता नाही हे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दोन कुटुंबांतील सात सदस्य पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशात आले होते. ते चंबा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या दालहौसी येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि २९ मे रोजी सच पास येथे पर्यटनासाठी निघाले होते. या पर्यटकांनी संध्याकाळपर्यंत त्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये परत यायचे होते. रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने आणि त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने, हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिली, यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.
खोल दरीमुळे पथकाला अडचणी
पोलिस पथकाने केलेल्या शोध मोहिमेदरम्यान, बैरागढ-सच पास-किलाड रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणारी एक एर्टिगा कार खोल दरीत कोसळल्याचे आढळून आले. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. अपघातस्थळ अत्यंत दुर्गम भागात असल्यामुळे पोलीस आणि बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचायला बराच वेळ लागत आहे.
मृतांमध्ये छत्तीसगडमधील सात जणांचा समावेश
मृतांमध्ये छत्तीसगडचे रहिवासी अरविंद, त्यांची पत्नी प्राची, त्यांचे दोन मुलगे दर्श आणि अपशाद, तसेच पी. जी. कार्तिगेयन, त्यांची पत्नी मणिमाला आणि त्यांचा मुलगा नंदन यांचा समावेश आहे. चालक विश्वास यांचाही मृत्यू झाला. विश्वास हे चंबा जिल्ह्यातील दलहौसी भागाचे रहिवासी होते. अपघाताच्या वेळी वाहनात एकूण आठ जण होते.