आडगाव फाट्यावरील घटना
सिल्लोड, (प्रतिनिधी) तालुक्यातील आडगाव फाट्याजवळ एका शेतात २२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता झाडावर बसलेल्या दोन माकडांनी अचानक हल्ला केल्याने ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला.
विकी बदिया बारेला वय ८ वर्ष (रा. खांडवा, मध्य प्रदेश) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याच्यावर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवले आहे.
मध्य प्रदेशातील खांडवा येथील अदरक तोडणीसाठी आलेले मजूर सध्या तालुक्यात वास्तव्यास आहेत. २२ मार्च रोजी आडगाव फाट्याजवळील शेतात मजूर काम करत असताना त्यांचा हा मुलगा झाडाखाली खेळत होता.
यावेळी झाडावर असलेल्या दोन माकडांनी त्यावर अचानक हल्ला चढवला. त्याच्या पायाला चावा घेतला. या हल्ल्यात विकी गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास गोठवाल यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.












