२४ तासात ९ जणांची हत्या, १४ घरं आगीच्या भक्ष्यस्थानी, दोन समुदायांमध्ये हिंसाचार भडकला, नेमक काय घडलं?

Foto
इंम्फाळ : ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. नागा आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला असून, १४ घरांना आग लावण्यात आली आहे. या घटनेनंतर नागा आणि कुकी समुदायांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कांगपोकपी जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारात कामजोंग जिल्ह्यात गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या एका कुकी महिलेचा समावेश आहे. याशिवाय कामजोंग आणि कांगपोकपी जिल्ह्यांत वेगवेगळ्या हल्ल्यांत नागा व्हिलेज गार्डचा मृत्यू झाला. तसेच उखरुल जिल्ह्यात घात लावून करण्यात आलेल्या हल्ल्यात एका सामान्य नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.

या हिंसाचारानंतर कामजोंग जिल्हा प्रशासनाने चसाड पोलीस ठाण्याच्या ४०० मीटर परिसरात नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, कुकी संघटना ङ्गकमिटी ऑन ट्रायबल युनिटीफ () ने शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून कांगपोकपी जिल्ह्यात २४ तासांच्या बंदची घोषणा केली. दरम्यान शुक्रवारी रात्री चसाड पोलीस ठाण्याजवळ झालेल्या गोळीबारानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली. या गोळीबारात ४२ वर्षीय डोमखोनी टौथांग यांचा मृत्यू झाला. त्या पाच मुलांच्या आई होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चसाड पोलीस ठाण्याजवळ कथितरीत्या बेकायदेशीर बंकर बांधले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते हटवण्यासाठी नागरी पोलीस, इंडिया रिझर्व्ह बटालियन आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त मोहीम सुरू केली होती.

यावेळी काही अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी सुरक्षा कर्मचार्‍यांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. या कारवाईत स्थानिक महिलांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या गोंधळादरम्यान डोमखोनी टौथांग यांच्या मानेजवळ आणि छातीच्या वरच्या भागात डाव्या बाजूला गोळी लागली. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९ वाजून ३५ मिनिटांनी घडली. चसाड गावातील स्वयंसेवकांना कथितरीत्या मनमानी पद्धतीने अटक करून ताब्यात ठेवल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असताना हा गोळीबार झाला.

महिलेच्या मृत्यूनंतर जाळपोळ
या महिलांच्या मृत्यूनंतर परिसरात जाळपोळ सुरू झाली. सशस्त्र गट आणि सुरक्षा दलांमध्ये पुन्हा गोळीबार झाला. या हिंसाचारात दोन्ही समुदायांतील सदस्यांच्या किमान १४ घरांना आग लावण्यात आली.अधिकार्‍यांनी सांगितले की, उपद्रवींनी चसाड पोलीस ठाण्यालाही आग लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या काही लाकडी दुकानांचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी सुमारे ५ वाजता पुन्हा गोळीबार सुरू झाला. हा गोळीबार सकाळी जवळपास ७ वाजेपर्यंत सुरू होता.दरम्यान, कुकी विमेन्स युनियनच्या मुख्यालयाने २३ वर्षीय मायकेल मिनलेन हाओकिप यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा दावा केला. नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम (इसाक-मुइवा), म्हणजेच - आणि त्याच्या ईस्टर्न फ्लँक गटातील सदस्यांनी ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपाची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

कामजोंगमध्ये दोन नागा व्हिलेज गार्डची हत्या
दुसर्‍या एका घटनेत शनिवारी सकाळी सुमारे ९ वाजून ३० मिनिटांनी कामजोंग जिल्ह्यातील निंगचो चिंगडोंग गावावर हल्ला झाला. या हल्ल्यात दोन नागा व्हिलेज गार्डचा मृत्यू झाला. न्गाचान्सो निंगशेन (वय ३०) आणि लीशिशन हंग्यो (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे गाव चसाड पोलीस ठाण्यापासून सुमारे १७ किलोमीटर आग्नेय दिशेला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, भारत-म्यानमार सीमेवर सक्रिय असलेले सशस्त्र गट या हल्ल्यात सहभागी असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कांगपोकपी जिल्ह्यात सशस्त्र कुकी अतिरेक्यांच्या संशयित गटाने घात लावून केलेल्या हल्ल्यात एका नागा व्हिलेज स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले.शनिवारी सकाळी सुमारे ६ वाजता इम्फाळ-तामेंगलाँग मार्गावर मकुई आणि तापोक गावांदरम्यान हा हल्ला झाला. हे ठिकाण चालवा पोलीस ठाण्यापासून सुमारे १५ किलोमीटर ईशान्य दिशेला आहे.

कांगपोकपी जिल्ह्यात २४ तासांचा बंद
मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कुकी संघटना ङ्गकमिटी ऑन ट्रायबल युनिटीने शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून कांगपोकपी जिल्ह्यात २४ तासांच्या संपूर्ण बंदची घोषणा केली आहे. नागा आणि कुकी समुदायांमधील तणाव वाढत असताना प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांसमोर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.