व्यापारी महासंघाच्या शिष्टमंळाने घेतली शरद पवारांची भेट

Foto
 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची आज जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात जिल्ह्यातील पॅकेज द्यावे, अशी मागणी करण्यात आली. 
खा. शरद पवार हे कोरोना संसर्गाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी रात्री शहरात आले. आज शनिवार रोजी सकाळी एका पंचतारांकिंत हॉटेलमध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, प्रकाश मुथा, शिवनाथ पेरे व राकेश सोनी यांनी पवार यांची भेट घेतली. शहरातील व्यापार्‍यांना राज्य सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्याच्या वीज बिलात 50 टक्के सुट द्यावी, ज्या व्यापार्‍यांनी बील भरले त्यांची रक्‍कम पुढील बिलात सामाविष्ट करावी, महानगरपालिका व नगर परिषद यांनी मालमत्ता कर सहा महिन्याचा माफ करावा व कराची रक्‍कम राज्य शासनाने मनपाला द्यावी, तसेच औरंगाबाद शहर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी 1 ऑगस्टपासून जिल्ह्यातील बाजारपेठा, हॉटेल व संबंधित व्यवसाय नियमित सुरू करण्यात यावेत, अशा आशयाचे निवेदन सादर केले. खा. पवार यांनी व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि याबाबत शासनाकडून योग्य ती मदत देण्याचे आश्‍वासन दिले, असे अध्यक्ष जगन्नाथ काळे व सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी सांगितले.