कुत्रा चावला आणि चिमुरडी गेली !! माझी निशा मला हाक मारेल... बापाने स्मशानाबाहेर बसून, घालवले दोन दिवस !!

Foto
ठाणे : कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुरडीने महिनाभराच्या उपचाराला दाद न देता अखेरचा श्वास घेतला. आपल्या लाडक्या लेकीचे दफन केल्यानंतरही आपली निशा उठून आपल्याला पुन्हा हाक मारेल या आशेने तिचे वडील दोन दिवस स्मशानाजवळच बसून होते.

दिवा पूर्वेकडील बेडेकरनगर परिसरातील नथुराम शिंदे यांची मुलगी निशा ही पाच वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. खेळता-खेळता ती कठड्यावर बसली, त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्या खांद्याचा चावा घेतला. निशाला रक्तबंबाळ अवस्थेत पालकांनी तातडीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिला रेबीज इंजेक्शनचे ठरलेले तीन डोस देण्यात आले. मात्र चौथ्या डोसदरम्यान तिची तब्येत खालावली.

 ३ डिसेंबरला निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी तिची प्रकृती स्थिर होती. मात्र १६ डिसेंबरला उपचाराचे शेवटचं इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली. ती स्वतःलाच चावे घेऊ लागली. कुत्र्याप्रमाणे आवाज काढू लागल्याने सर्वच घाबरले. तिला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात तिचा २१ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचा मामा समाधान कदम याने केला. यानंतर मुंबईतच तिच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 अंत्यविधीनंतर पिता विमनस्क अवस्थेत

अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानातील कागदपत्र घेऊन येतो म्हणून तिचे वडील निघाले. नातेवाईक लोकलने दिवा स्थानकात उतरले मात्र नथुराम दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध केली. दोन दिवस त्यांचा नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते सापडत नसल्याने सगळेच हवालदिल झाले होते.

 वडील काय म्हणत होते?

शेवटचा प्रयत्न म्हणून नातेवाईक स्मशानात पोचले तर स्मशानाजवळ नथुराम विमनस्क अवस्थेत बसल्याचे दिसून आले. आपली मुलगी हाक मारेल आणि आपण तिला मायेने कुशीत घेऊ या आशेने ते दोन दिवस तिथेच होते हे पाहून नातेवाइकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. कसेबसे समजावून नथुराम यांना घरी आणण्यात आले.