रिक्षाचालकाच्या टोळीने मुकुंदवाडीत तरुणाला लुटले

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : रिक्षाचालकासह त्याच्या दोन साथीदारांनी तरुणाला रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेऊन मारहाण करून लुटले. ही घटना सोमवारी (दि. २) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी भागात घडली.
फिर्यादी ओम संजय राऊत (१८, रा. गेवराई, जि बीड) हा त्याच्या मामाला भेटण्यासाठी दि. २८ फेब्रुवारीला रामनगर येथे आला होता. तेथून तो मूळ गावी गेवराई येथे जाण्यासाठी निघाला. सिडको बसस्थानकात जाण्यासाठी तो लाईफलाईन हॉस्पिटलजवळ रिक्षाची वाट पाहत असताना एक रिक्षा आली त्याने कठे जायचे अशी विचारणा करून त्याला रिक्षात बसविले. त्यात अगोदर दोघे बसलेले होते. रिक्षाचालकाने रिक्षा सिडको बसस्थानकाकडे न नेता धूत हॉस्पिटलकडून अजिंठा फार्मा कंपनीकडे घेऊन गेला. ओम त्याला सिडकोकडे जायचे आहे, इकडे कुठे नेत आहात, अशी विचारणा करत असताना तिघांनी त्याला मारहाण सुरू केली. ओमला धमकावून मोबाईलमधून ३५० रुपये ट्रान्स्फर करून घेतले. 
तसेच खिशातील रोख २ हजार रुपयेही बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर त्याला मारहाण करून रिक्षातून खाली ढकलून पसार झाले. घडलेल्या घटनेने ओम प्रचंड घाबरला होता. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक संजय बहुरे करत आहेत.