बंगळुरू : केंद्रीय अन्वेषण विभागाने शनिवारी संरक्षण मंत्रालयात तैनात असलेल्या लेफ्टनंट कर्नल अधिकार्याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली. उत्पादन विभागात तैनात असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्यावर बेंगळुरू येथील एका कंपनीकडून ३ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने शर्मा यांच्या घरातून २.३६ कोटी रुपये जप्त केले. सीबीआयने शर्मा यांच्या पत्नी कर्नल काजल बाली यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला. झडतीदरम्यान काजल यांच्या घरातून १० लाख रुपये जप्त करण्यात आले.
खासगी कंपन्यांसोबत कट रचला
काजल ही राजस्थानातील श्रीगंगानगर येथील डिव्हिजन ऑर्डनन्स युनिट (डीओयू) ची कमांडिंग ऑफिसर आहे. या प्रकरणात मध्यस्थ विनोद कुमारलाही अटक करण्यात आली आहे. दोघांना २३ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. १९ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे हा खटला दाखल करण्यात आला. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, लेफ्टनंट कर्नल यांनी संरक्षण उत्पादनांच्या निर्मिती आणि निर्यातीत सहभागी असलेल्या खाजगी कंपन्यांसोबत कट रचला होता जेणेकरून त्यांना फायदा होईल.
कर्नल जाळ्यात कसा सापडला?
सीबीआयला बेंगळुरूस्थित एका कंपनीकडून लाच दिल्याची माहिती मिळाली. राजीव यादव आणि रवजीत सिंग हे कंपनीच्या कारभारावर देखरेख करत होते. दोघेही शर्मा यांच्या सतत संपर्कात होते आणि विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांकडून कंपनीसाठी बेकायदेशीर मदत मिळवण्याचा प्रयत्न करत होते. अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी विनोद कुमारने १८ डिसेंबर रोजी बेंगळुरूस्थित कंपनीच्या सांगण्यावरून दीपक कुमार शर्मा यांना ३ लाख रुपयांची लाच दिली. तपास यंत्रणेचा दावा आहे की ही कंपनी दुबईमध्ये आहे आणि राजीव यादव आणि रवजीत सिंग हे भारतातील कारभारावर देखरेख करत होते.
घरातून रोख रक्कम आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त
या माहितीनंतर, तपास यंत्रणेने श्रीगंगानगर, बेंगळुरू आणि जम्मूसह अनेक ठिकाणी छापे घातले. दिल्लीतील लेफ्टनंट कर्नल शर्मा यांच्या घराच्या झडतीदरम्यान, २.२३ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले. अधिकार्यांनी श्रीगंगानगर येथील त्याच्या पत्नीच्या घरातून १० लाख रुपयांची रोकडही जप्त केली. कार्यालयाचीही झडती सुरू आहे. दोन्ही आरोपींना २० डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. २३ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.