लवकरच मोठा राजकीय भूकंप? शरद पवार गट एनटडीएसोबत जाणार ? आमदारांचा दबाव; खासदारांचीही मते जाणून घेतली

Foto
मुंबई : भाजप प्रणीत एनडीएसोबत जाण्याची तयारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने चालविली असून, त्यासंदर्भात पक्षाच्या दहापैकी नऊ आमदारांची मते ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी जाणून घेतली आहेत. पक्षाच्या खासदारांशीही ते बोलले असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलून लवकरच काय तो निर्णय करू, असे पाटील यांनी त्यांना सांगितल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

पावसाळी अधिवेशनात शेवटच्या टप्प्यात आमदारांची बैठक विधान भवनातच झाली. या बैठकीला रोहित पवार सोडून पक्षाचे नऊ विधानसभा सदस्य हजर होते. या बैठकीत आधी पाटील यांनी सर्व आमदारांची मते जाणून घेतली. त्यावर बहुतेकांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरला, अशी माहिती आहे.  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा आपल्या पक्षाने थेट भाजप प्रणीत एनडीएचा घटक पक्ष बनावे अशी सूचना आमदारांनी केली.

मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी निधी हवा असेल आणि २०२९ मध्ये चांगले यश मिळवायचे असेल तर भाजपसोबत आणि पर्यायाने एनडीएसोबत जाणे आवश्यक असल्याचे मत बहुतेक आमदारांनी त्या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. अशी बैठक झाल्याच्या वृत्ताला नाव न देण्याच्या अटीवर पक्षाच्या तीन आमदारांनी दुजोरा दिला. ङ्गआपल्या पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाईल; पण, आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे,फ असे सूचक उद्गार पाटील यांनी आमदारांच्या बैठकीत काढल्याचे सूत्रांनी सांगितले. जयंत पाटील यांना मोबाइलवर सायंकाळपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण, मोबाइल स्विच ऑफ होता. मी आता त्यांच्यासमवेत नाही, असे त्यांच्या पीएंनी सांगितले.

निर्णय शरद पवार घेणार...
तुमच्या अपेक्षांबाबत मी शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करेन. सध्या एनडीएसोबत जाणे हा एक पर्याय दिसतो पण, अंतिम निर्णय शरद पवार घेतील. लवकरच तुम्हाला पक्षाचा निर्णय कळेल असे जयंत पाटील यांनी या बैठकीत सांगितल्याचेही समजते. भाजपसोबत जाण्याबाबत खासदारांची मानसिकता काय हेही एकेकाशी बोलून पाटील यांनी जाणून घेतले आहे, असे समजते. दरम्यान नऊ आमदारांच्या बैठकीपासून आ. रोहित पवार यांना दूर ठेवण्यात आले. त्यांचा भाजपसोबत पक्षाने जाण्यास तीव्र विरोध असल्याने त्यांना दूर ठेवण्यात आले, अशी चर्चा आहे. दुसरीकडे रोहित पवार यांनीही प्रत्येक आमदारास फोन करून भाजपसोबत जाण्याच्या मन:स्थितीत आहात का असे विचारल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट राजकीय नव्हे तर कामासाठी : आ. जयंत पाटील
दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी काल (१४ जुलै) रात्री अचानक वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले. जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तिन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती एका वृत्त वाहिनीने दिली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांची वेगळी बैठक झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. सुरुवातीला सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटील देखील वर्षावर पोहोचले. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नाही. या भेटीवर आज जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती खरी नसल्याचे सांगितले.