गंगापूर (प्रतिनिधी ) : गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान केंद्राजवळ असलेल्या जुन्या शाळेच्या इमारतीला मतदान सुरू होण्यापूर्वीच पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत इमारतीमधील शालेय साहित्य जळून खाक झाले. मात्र वेळेवर आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेल्या पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड व पोलीस सहाय्यक निरीक्षक सुजाता राजपूत, पोलीस कर्मचारी विजय पारखे तसेच मतदानासाठी मतपेट्या घेऊन येणाऱ्या शिक्षकांनी तात्काळ याची दखल घेतली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर नगर पालिकेच्या अग्निशामन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
जामगाव येथील जिल्हा परिषद मतदान केंद्र परिसरात आग विझविण्याच्या कामात गंगापूर नगर पालिकेचे कर्मचारी किशोर जाधव, मुबारक शेख, रविकांत खाजेकर, पवन खाजेकर तसेच जामगावचे पोलीस पाटील मोहन आढावा यांनी परिश्रम घेतले. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.














