इराणने मांडलेल्या १० कलमी शांतता प्रस्तावावरून आता नवा वाद , वाटाघाटीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता

Foto
मुंबई  : अमेरिका आणि इराण दरम्यान १४ दिवसांचा 'सीझफायर' (युद्धविराम) सुरू झाला असला तरी, इराणने मांडलेल्या १० कलमी शांतता प्रस्तावावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रस्तावाच्या फारसी आणि इंग्रजी भाषांतरामध्ये महत्त्वाचा फरक आढळून आला असून, यामुळे वाटाघाटीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणने आपल्या देशांतर्गत वापरासाठी जारी केलेल्या फारसी मसुद्यात "युरेनियम संवर्धन मान्य करणे" ही अट समाविष्ट केली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि पत्रकारांना दिलेल्या इंग्रजी मसुद्यातून ही अट 'गायब' आहे. हा फरक तांत्रिक चुकीमुळे आहे की इराणच्या दुहेरी रणनीतीचा भाग, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ट्रम्प यांच्या भूमिकेशी विसंगत अट
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे मोडीत काढण्याची भूमिका घेतली आहे. जर इराणने युरेनियम संवर्धनाची अट कायम ठेवली, तर ट्रम्प प्रशासन हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, इराण आपल्या जनतेला 'आम्ही अण्वस्त्र हक्क सोडला नाही' असे दाखवण्यासाठी फारसी मसुद्यात अशा अटी घालत असावा.

सीझफायर आणि पुढच्या हालचाली
इराणने दोन आठवड्यांचा युद्धविराम मान्य करतानाच 'होर्मुझची सामुद्रधुनी' जहाजांच्या वाहतुकीसाठी खुली करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, वॉशिंग्टनकडून इराणच्या १० कलमी प्रस्तावावर अद्याप कोणतीही अधिकृत मोहोर उमटवण्यात आलेली नाही. ट्रम्प यांनी केवळ याला "चर्चेसाठी एक आधार" म्हटले आहे. १० एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या बैठकीत या भाषांतरातील फरकावरही स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते.