अकोला: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, आता या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात बोलताना अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ङ्गङ्घविमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होते,ङ्घङ्घ असे वक्तव्य करत अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता घातपाताचे नवे वळण दिले आहे.
सरपंचांचा तो दावा आणि मिटकरींचा गौप्यस्फोट
अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील सभेत बोलताना अपघाताच्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, ङ्गङ्घघटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो होतो. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी मला एक हादरवून टाकणारी माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पाहिले होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले, पण ते जवळ पोहोचण्यापूर्वीच विमानाचा भीषण स्फोट झाला, असल्याचे मिटकरी यांनी सांगितले.
हा घातपात असेल तर बदला घेणार...
अजित पवारांच्या मृत्यूबाबत मिटकरींनी पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त केला आहे. आता अधिक आक्रमक होत त्यांनी स्पष्ट केले की, हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत या मृत्यूचे गूढ उकलत नाही, तोपर्यंत मी जिवंत असेपर्यंत लढा देत राहीन. जर दादांच्या मृत्यूचा कट रचला गेला असेल, तर त्याचा बदला घेणे ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे.
तपासाच्या मागणीला जोर
मिटकरींच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करणारी ती व्यक्ती कोण होती? तांत्रिक बिघाड की घातपात? असे अनेक प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. या खुलाशांनंतर आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहेत.