औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच एक अपंग व्यक्ती भोवळ येऊन कोसळल्याची घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. सभोवताली उभ्या असलेल्या धडधाकट मंडळींनी या व्यक्तीला पाणी देण्यासाठी धावाधाव केली. मात्र पाण्याचे कूलर सापडले नाही. अखेर दहा मिनिटांनी सदर व्यक्ती उठून उभा राहिला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्याचे कूलर सापडत नसल्याच्या असंख्य तक्रारी येत असतात. पाण्याचे कूलर असले तरी पिण्यासाठी साधा ग्लासही येथे नसतो. आज दुपारी १२ च्या सुमारास एक अपंग व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात आला. उष्णतेच्या पाऱ्याने या व्यक्तीला कार्यालयाच्या प्रवेशदारातच भोवळ आली अन तो धाडकन कोसळला. सभोवताली उभ्या असलेल्या धडधाकट मंडळींनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठेना. अखेर काहींनी पाणी मिळावे यासाठी धावाधाव केली. मात्र त्यांना पाण्याचे कुलर सापडले नाही. काही वेळाने सदर व्यक्ती शुद्धीवर आला अन उठून उभा राहिला. त्याला वेळेवर पाणीही मिळाले नाही. या घटनेने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्यासाठी पाणीही मिळत नाही याबाबत वारंवार आवाज उठवला जात आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात मोठे वॉटर कुलर लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन हवेत विरले. आताही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे याबाबत वारंवार मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रशासन अद्यापही ढिम्मच आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना पिण्यासाठी पाणीही मिळू नये, यापेक्षा दुर्दैव ते काय असे आता बोलले जाते.