देशभरातील विधानपरिषदांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का ! भाजपाने मात्र २२ पैकी १४ जागा जिंकल्या !!

Foto
मुंबई : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहार या चार राज्यांत नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एकूण २८ जागांपैकी काँग्रेसने १२ जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र या १२ पैकी एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही. विशेष म्हणजे, कर्नाटकात खुद्द काँग्रेसचेच सरकार आहे. मात्र, तेथेही काँग्रेसला खाते उघडता आले नाही. तर दुसऱ्या बाजूला भाजपने एकूण २२ जागांवर निवडणूक लढवली आणि १४ जागांवर दणदणीत विजयी पताका फडकावली आहे.

महत्वाचे म्हणजे, काँग्रेस सातत्याने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहे. आता एमएलसी निवडणुका बॅलेट पेपरवरच पार पडल्या आहेत. मात्र, यांत काँग्रेसचा मोठा पराभव झाल्याने, अनेक पक्ष काँग्रेसवर निशाणा साधत आहेत.

अशी आहे चारही राज्यांतील स्थिती -
- कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असूनही, त्यांना येथे चारपैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.   
- काँग्रेसने बिहारमध्ये ५ जागांवर निवडणूक लढवली. मात्र येथे त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली. 
- महाराष्ट्रातही काँग्रेसने ३ जागांवर नशीब आजमावले. पण हाती नैराश्यच आले.
- उत्तर प्रदेशात ११ जागांपैकी एकाही जागेवर काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता.   

पक्षांतर्गत धुसफूस आणि नेत्यांची नाराजी -
बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, काँग्रेसमध्येच अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. काँग्रेस खासदार मनोज कुमार यांनी बिहारमधील निकाल चिंताजनक असल्याचे म्हणत, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी नेत्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे. तसेच काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनीही अयोग्य उमेदवारांची निवड केल्याने हा पराभव बघावा लागत असल्याचे म्हटले आहे.