वाराणसी : वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान ज्या प्रवाशाच्या पिस्तुलातून गोळी सुटली, ते प्रवासी कमलेश राय यांच्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कमलेश राय हे मुंबईचे माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते असून, त्यांचे उत्तर प्रदेशातील आजमगड येथे मोठे शैक्षणिक व राजकीय वजन आहे. या घटनेत एका महिला कर्मचाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले आहे.
आजमगड येथील रहिवासी आणि मुंबईतील माजी नगरसेवक असलेले शिवसेना नेते कमलेश राय हे पत्नीसह एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. प्रवासाच्या नियमांनुसार, त्यांनी आपल्याकडील परवानाधारक शस्त्र आधीच सुरक्षा अधिकाऱ्यांना घोषित केले होते. यावेळी ही घटना घडली आहे. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.
या प्रकरणात जखमी सुरक्षा कर्मचाऱ्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक जबाब समोर आला आहे. "तपासणीदरम्यान प्रवाशाने पिस्तूल बाहेर काढली आणि थेट ट्रिगर दाबला," अशी माहिती जखमी सुरक्षा कर्मचारी रोहितने दिली आहे. या गोळीबारात महिला कर्मचारी सुमन यांच्या पायाला थेट गोळी लागली, तर रोहित यांच्या पायाला गोळीचे छर्रे लागले आहेत. "मी आणि माझी सहकारी सुमन हे दोघे शस्त्राच्या तपासणीसाठी आणि एक्स-रे करण्यासाठी काउंटरवर पोहोचलो होतो. प्रवाशाने (कमलेश राय) स्वतःची पिस्तूल बाहेर काढली. त्या पिस्तुलात आधीपासूनच गोळी लोड होती. तपासणी सुरू असतानाच प्रवाशाने अचानक ट्रिगर दाबला. त्यावेळी सुमन बरोबर समोर उभ्या होत्या. त्यामुळे गोळी थेट सुमन यांच्या पायात घुसली, तर गोळीचे छर्रे माझ्या पायाला लागले. प्रवाशाने तो ट्रिगर जाणूनबुजून दाबला की त्याच्याकडून चुकून हे घडले, हे मी खात्रीशीर सांगू शकत नाही," असे रोहितने स्पष्ट केले.
कमलेश राय कोण आहेत?
कमलेश राय हे मूळचे उत्तर प्रदेशातील आजमगडचे रहिवासी असून ते शिवसेनेचे नेते आहेत. कमलेश राय हे स्वतः मुंबई महानगरपालिकेत माजी नगरसेवक राहिलेले आहेत. सध्या त्यांचा मुलगा मुंबईत विद्यमान नगरसेवक आहे, तर त्यांची आई आजमगडमधील स्थानिक ग्रामपंचायतीची सरपंच आहे. स्थानिक पातळीवर राजकीय आणि सामाजिक दबदबा असल्याने ते नेहमी दोन खाजगी अंगरक्षकांसह वावरतात. आजमगड जिल्ह्यातील जीयनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे कमलेश राय हे 'बाबू शिव पत्थर राय पदव्युत्तर महाविद्यालय' चालवतात आणि ते या महाविद्यालयाचे व्यवस्थापक आहेत. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार धनंजय सिंह यांच्यासोबतची छायाचित्रे आहेत.