सहा महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, जंगलात अशा आवस्थेत सापडले जोडपे

Foto

सिल्लोड – तालुक्यातील आधारवाडी गावातील जंगलात झाडाला गळफास घेऊन तरुण पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी घडली असून त्यांचे मृतदेह सोमवारी जंगलात सागाच्या झाडाला लटकलेल्या आवस्थेत सापडले. मृत महिला गर्भवती असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. 

 

सहा महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधारवाडी येथील राजू श्रीराम चोरमले (२५) आणि त्याची पत्नी अनिता राजू चोरमले यांचे मृतदेह रविवारी रात्री जंगलातील सागाच्या झाडाला गळफास घेतलेल्या आवस्थेत ग्रामस्थांना आढळून आले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी सिल्लोड पोलिसांना कळवली आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह खाली उतरवण्यात आले. पोलिसांनी आकस्माक मृत्यूची नोंद केली आहे. राजू आणि अनिता यांचे सहा महिन्यापूर्वी १२ मे रोजी लग्न झाले होते. त्यानंतर असे काय झाले की, दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या केली, याचा तपास पोलिस करत आहेत.

रविवारी सकाळी डबा घेऊन गेले होते शेतात

गावकऱ्यांनी सांगितले, की राजू चोरमले आणि त्याची पत्नी अनिता हे रोजच्या प्रमाणे रविवारी सकाळी शेतात गेले होते. त्यांच्यासोबत जेवणाचा डबाही होता. रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी आले नाही तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरु केला. आधारवाडीला लागून असलेल्या धारला येथे जाण्यासाठी असलेल्या पायवाटेवरील सागाच्या झाडाला दोघांनी गळफास घतला असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले.

 

सोमवारी दोघांवरही एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार

गावकऱ्यांनी या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संदिप सावळे, मुख्य हवालदार बी.एस.वाघ, डी.पी.दांडगे, भिकन सतुके, शांताराम सपकाळ, विष्णू ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. सोमवारी (ता.१९) सायंकाळी पतीपत्नीवर आधारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

आत्महत्या केलेल्या जोडप्याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यानंतर अनिता गर्भवती होती. या दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या करण्यामागे काय कारण आहे, याचा तपास करण्याचे आदेश सहायक पोलिस उपनिरीक्षक विश्वास पाटील यांनी दिले आहेत.