सिल्लोड, (प्रतिनिधी): शिक्षणाचा इतिहास, भूतकाळातील, भविष्यातील, वर्तमानातील कायदे, विद्यार्थ्यांसाठी गरजेचे घटक आदी याचा सारासार विचार करून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतील दशसूत्री या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण भविष्याचा वेध घेणाऱ्या घटकावर पुस्तिका तयार करण्याच्या अनुषंगाने माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, शिक्षक विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी संवाद साधत असताना त्या म्हणाल्या की, जिल्हाधिकारी स्वामी साहेबांची संकल्पना तुम्हा अनुभवी शिक्षक लेखकांच्या मदतीने पुस्तक स्वरूपात राज्यभर पोहोचेल, आणि ती राज्यातील शिक्षक शाळांसाठी मार्गदर्शिका ठरेल असा आशावाद व्यक्त केला.
शैक्षणिक कामावर वर्षानुवर्ष, संशोधन, लिखाण करावेच लागते, परंतु मागील आशयाचा संदर्भ घेत, बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना रुचाव्यात, पचनी पडाव्यात अशा बाबीस नव विचारांची धार लावणे तितकेच महत्त्वाचे. त्यातीलच एक भाग म्हणून वर्षभरापासून जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी स्वामी साहेबांच्या मार्गदर्शक आदेशाने दहा घटकांचा समावेश विद्यार्थ्यांसाठी राबविणे सुरू असून, तो स्वतंत्र पुस्तक स्वरूपात यावा या अनुषंगाने शिक्षण विभाग पुढाकार घेत असून त्याची पायाभरणी सुरू झाली आहे.
यावेळी ऑनलाइन मिटिंगद्वारे जोडल्या जाऊन जिल्हाधिकारी म्हणाले की, तुम्ही शिक्षक लेखकांनी केलेली पुस्तिका विद्यार्थ्यांना, पालकांनाच नव्हे तर राज्याच्या शिक्षण विभागास न्याय देईल. शैक्षणिक कामात फक्त दिवस घालवून चालणार नाही, तर जगावेगळी कामे करत शैक्षणिक क्रांती घडविणे गरजेचे. जीव ओतून काम करत ज्ञानदान कार्यात अमूल्य योगदान देऊन विद्यार्थी हित जोपासण्याचा सल्ला दिला.
पुस्तकात येणारे दहा घटक पुढील, गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रदान करणे, स्पर्धात्मक विद्यार्थी घडवणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे, आय.टी. क्षम तंत्रस्नेही विद्यार्थी घडविणे, कौशल्यपूर्ण स्वावलंबित विद्यार्थी घडविणे, आनंददायी नाविन्यपूर्ण व रचनात्मक शिक्षण देणे, मुलींची सुरक्षितता महिला सन्मान वाढवणे, आत्मविश्वास जागृती, स्वः अभिव्यक्ती प्रोत्साहन स्वः गुणांना चालना, नवशिक्षण पद्धती अद्यावत ज्ञानमय शिक्षक तयार करणे आदींचा समावेश आहे. यावेळी शिक्षणाअधिकारी अश्विनी लाठकर, जयश्री चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांनी मांडणी केली.















