वैजापूर, (प्रतिनिधी): वैजापूर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ७५२ वर सेंट मोनिका शाळेजवळ उसाचा वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाला. पहाटेच्या वेळेस घटना घडल्याने घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सध्या ऊस तोडीचा हंगाम असल्याने तालुक्यातून कारखान्यासाठी उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
शाळेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली :
ज्या ठिकाणी ट्रॅक्टर पलटी झाला, त्याच्या बाजूला सेंट मोनिका शाळा आहे. रविवारी सुट्टी असल्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्कूलबस उभ्या असतात. व विद्यार्थी नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॅक्टरला दोन ते तीन टॉली जोडून उसाची वाहतूक करत आहे. अनेक वेळा ट्रॅक्टरला मागील बाजूस रिफ्लेक्टर लावलेले नसते.
तसेच ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात उसाची वाहतूक होत असल्याने ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटना वाढत आहे. काही दिवसांपूर्वी गंगापूर वैजापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टर न दिसल्याने दोन दुचाकी चालकांचा मृत्यू झाला होता. प्रादेशिक परिवहन विभागाने याची दखल घेऊन क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या ऊस ट्रॅक्टर वरती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे
















