वैजापूर, (प्रतिनिधी) : वैजापूर शहरात मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रात्री २ वाजेच्या सुमारास स्टीलचे अवजड रोल वाहून नेणारा एक ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक पलटी होताच त्यातील अजस्त्र स्टीलचे रोल्स रस्त्यावर विखुरले गेले. मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राजस्थानहून आलेला आणि गंगापूरच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक ( १९ ४५३५) हा भरधाव वेगात असताना चालकाचा ताबा सुटला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वळणावर हा अवजड ट्रक थेट रस्त्यावर आडवा झाला. ट्रक पलटी होताच झालेल्या प्रचंड आवाजाने परिसरातील नागरिक गाढ झोपेतून जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात रफिक खा (वय ३२) आणि लडूराम (वय १७), (दोन्ही राहणार जोधपूर, राजस्थान) हे दोन तरुण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती
मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमींना तातडीने ट्रकबाहेर काढले आणि उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची गंभीरता लक्षात घेता, वैजापूर नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा तातडीने सक्रीय होत धाव घेतली. क्रेनच्या मदतीने ट्रक व स्टील बाजूला केले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. या ठिकाणी वैजापूर नगर पालिकाचे नगर अध्यक्ष दिनेश परदेशी, वैजापूर पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस कर्मचारी नगरपालिका कर्मचारी यांनी धाव घेत मदत केली.















