जय माता दी...
भक्ती आणि इतिहासाचा अनोखा संगम
डोंगरमाथ्याशी भांगसी मातेचा जागर
उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर : शहरापासून अवघ्या १४
किलोमीटर अंतरावर असलेले शरणापूर येथील भांगसी मातादेवी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे आणि ऐतिहासिक वारशाचे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. डोंगराच्या उंच शिखरावर वसलेले हे मंदिर भांगसीगड म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे.
निसर्गरम्य परिसर, डोंगरातील गुहेत असलेले देवीचे प्राचीन स्थान आणि ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याचे विहंगम दर्शन यामुळे या ठिकाणाला धार्मिक आणि पर्यटनाच्या
दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले
आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे दर्शनासाठी हजारो भाविक येतात. भांगसी माता देवी मंदिर शरणापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जवळ, एक प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणाला भांगसीगड असेही म्हणतात.
स्थान आणि इतिहास
हे मंदिर देवगिरी रस्त्यावर एका छोट्या डोंगरावर वसलेले आहे. इतिहास पाहिला तर भांगसीगडाचा निश्चित इतिहास उपलब्ध नाही, परंतु काही अभ्यासकांच्या मते देवगिरी किल्ल्याच्या संरक्षणासाठी या गडाचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. डोंगराच्या शिखरावर असल्यामुळे इथून परिसरावर लक्ष ठेवणे सोपे होते. तसेच, अनेक देवीदेवतांच्या निवासस्थानाला गड म्हणण्याची आपल्याकडे परंपरा आहे, त्याप्रमाणे या डोंगराला भांगसीगड असे नाव मिळाले असावे. असे म्हंटले जाते. मंदिराची रचना डोंगरावर जाण्यासाठी सुमारे ५७४ पायऱ्या आहेत. देवीचे मूळ मंदिर एका गुहेत आहे, आणि त्याच्यावरच नवीन भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरातून देवगिरी किल्ला आणि परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
मंदिराची वैशिष्ट्ये
देवीची मूर्ती एका भुयारी गुहेत आहे. या गुहेत उतरूनच देवीच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. गडावर लहान-मोठ्या गुहा आहेत. यातील एक गुहेत देवीची स्थापना केलेली आहे. सासू-सुनेचे कुंड नावाने ओळखले जाणारे दोन कुंड देखील येथे आहेत, ज्यातील एकातील पाणी शुद्ध मानले जाते. मंदिराच्या पायथ्याशी श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांच्या नावाने एक मोठे गुरुकुल आणि आश्रम आहे. येथे शिक्षण, गोशाळा आणि इतर धार्मिक उपक्रम चालवले जातात. नवरात्रीत येथे मोठा उत्सव साजरा होतो. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हे ठिकाण धार्मिक तसेच निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्या लोकांसाठी एक चांगले ठिकाण आहे. गडाच्या उंच शिखरावरून ऐतिहासिक दौलताबाद किल्ला आणि वाळूज औद्योगिक वसाहतीचे विस्तीर्ण दृश्य दिसते. पावसाळ्यात येथील निसर्गाचे सौंदर्य अधिकच वाढते. हे मंदिर शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात.
https://epaper.sanjwarts.in/Powered By: Vrudhee Solutions













