राज्यात हवामानाचा यू-टर्न! अनेक भागात पावसाचा इशारा; मराठवाड्यातही बरसणार

Foto
पुणे : एकीकडे राज्यात ऑक्टोबर हिटमुळे उन्हाचा चटका तीव्र होत असतानाच आता हवामानाने अचानक यू-टर्न घेतला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पुढील काही दिवस विविध भागांत पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पुण्यात पुढील पाच दिवस हवामानाची स्थिती कशी राहील, हे जाणून घेऊ.

पुण्यात पुढील ५ दिवस हवामान कसे राहील?
पुढील पाच दिवस शहरात हवामानात बदल पाहायला मिळतील. रविवार (१८ ऑक्टोबर) ते शुक्रवार (२३ ऑक्टोबर) दरम्यान पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत्वे निरभ्र राहील. मात्र दुपारी किंवा सायंकाळच्या वेळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील इतर भागांत पावसाची स्थिती कशी असेल?
रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ आणि २० ऑक्टोबर म्हणजेच सोमवार-मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. २१ ऑक्टोबरनंतर मराठवाडा आणि विदर्भात हवामान पुन्हा कोरडे होईल. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत (२३ ऑक्टोबर) पावसाची शक्यता कायम राहील.

हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनार्‍यालगत ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वार्‍यांची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय लक्षद्वीप बेटांजवळही चक्रीय वार्‍यांची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडू ते नैऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत आणि कर्नाटक किनार्‍यालगतच्या अरबी समुद्रापासून कोमोरिन भागापर्यंत कमकुवत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळेच महाराष्ट्रात सर्वत्र पावसाला पोषक वातावरण बनले आहे.