रामराई गावाजवळील घटना, नातेवाइकांचा संताप
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : कंपनीत निघालेल्या एका दुचाकीस्वार कामगार तरुणाचा अपघात झाल्याची घटना गुरूवारी (दि. १५) सकाळी साडेसहा वाजता रामराई गावाजवळील जोगेश्वरी रस्त्यावर (गट नंबर ९९) घडली. यात तो जागीच ठार झाला असून आकाश विठ्ठल वाघमारे (२६) रा. जोगेश्वरी (ता. गंगापूर) असे मयताचे नाव आहे.
दरम्यान, येथे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून मातीची ढिगारे रस्त्यावर पडली असून झालेल्या खड्डयामुळेच त्याचा अपघात झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. आकाश वाघमारे हा सकाळी सहाच्या सुमारास घरातून दुचाकी (क्र. एमएच २० ईओ २४८६) ने कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाला होता. जोगेश्वरी रस्त्यावरील रामराई शिवारातील गट नंबर ९९ जवळ येताच रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्याजवळ त्याचा, अपघात झाला. याची माहिती नातेवाईकांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना आकाश जखमी होऊन बेशुद्धावस्थेत दिसून आला.
जखमीचा लहान भाऊ प्रदीप वाघमारे व अन्य नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी घाटीत दाखल केले असता सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. आकाश वाघमारे हा गरीब कामगार होता. ठेकेदारामार्फत खाजगी कंपनीत रोजंदारीवर काम करत होता. तो विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. एक अडीच वर्षाची जर दूसरी सहा महिन्यांची आहे. घटनेची नोंद एमआयडीसी ठाण्यात घेण्यात आली आहे. घटनेची माहिती घाटी चौकीतील पोलिसांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली.
दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्याराव शिंदे यांनी जेव्हा घटनास्थळी भेट दिली असता है घटनास्थळ वाळूज पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने त्यांनी तो गुन्हा वाळूज पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. दरम्यान वाळूजचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख गफ्फार हे घाटीत दाखल झाले व शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.