गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर शहरातील वैजापूर रोड न्यायालयासमोरील मुख्य रस्त्यावर सोमवारी (दि. २३ फेब्रुवारी) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास २१ वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. न्यायालय परिसरासारख्या संवेदनशील ठिकाणी भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे गंगापूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी रात्री ११:३० वाजता गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूतन कॉलनी येथील अक्षय अनिल बारवाल (वय २१) हा तरुण न्यायालय परिसरातील मुख्य रस्त्यावर असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर अज्ञात
धारदार शस्त्राने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत तो कोसळल्यानंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्याला गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.
तेथे डॉ. हर्षल धाबे यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपींचा शोध
सुरू आहे.
रात्री उशिरा या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जखमी अक्षयचा लहान भाऊ शुभम अनिल बारवाल याने दिलेल्या फिर्यादीवरून दीपक साळवे, अशोक मावस, अभिषेक मावस, हर्ष गायकवाड, (रा. सर्व म्हाडा कॉलनी, गंगापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी सांगितले. वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा हा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुमारसिंह राठोड, सहपोनि. विठ्ठल झांजुर्णे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शिवाजी महाराज चौक ते वैजापूर रोड जवळपास न्यायालय परिसरात घडलेल्या या थरारक प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.














