कर्णपुऱ्यात श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा जागर

Foto
जय माता दी...

धार्मिक विधी अन् भव्य यात्रेने परिसर भक्तिमय...
उज्ज्वला साळुंके
शहराचे छत्रपती संभाजीनगर ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्णपुरा येथील तुळजाभवानी माता मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अनुपम सोहळा अनुभवायला मिळत आहे. आई कर्णपुरा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची पावले मंदिराकडे वळत असून, आई अंबाबाईचा उदो उदो, जय भवानी, जय अंबे आणि जय तुळजाभवानी माताच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. मंदिरातील धार्मिक विधी, देवीच्या दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा, पूजाअर्चा, आरती आणि मंदिर परिसरात भरलेली पारंपरिक यात्रा यांमुळे कर्णपुरा परिसराला यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनात अनन्यसाधारण स्थान असलेली ही यात्रा म्हणजे केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून, पिढ्या‌न्पिढ्या जपल्या गेलेल्या श्रद्धेचा आणि सामूहिक संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. कर्णपुरा माता मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात धार्मिक वातावरण अधिकच मंगलमय होते. घटस्थापना, देवीची पूजा, आरती, नैवेद्य, फुलांची सजावट आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक, हातात पूजेचे ताट घेऊन मंदिराकडे जाणाऱ्या महिला, कुटुंबासह दर्शनासाठी आलेले नागरिक आणि देवीच्या नामस्मरणात तल्लीन झालेले भक्त असे चित्र या परिसरात पाहायला मिळते.
कर्णपुरात यात्रेचे आकर्षण
कर्णपुरा येथील नवरात्र यात्रा ही शहरवासीयांसाठी सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाची परंपरा मानली जाते. यात्रेचे नाव घेताच अनेकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते ते रंगीबेरंगी पाळणे, आकाशपाळण्याची उंच झेप, लहान मुलांचा आनंद, खेळण्यांची दुकाने, घरगुती वस्तूंची खरेदी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि कुटुंबासोबत घालवलेला आनंदाचा वेळ. धार्मिक दर्शनानंतर यात्रेत फेरफटका मारणे, मुलांसाठी खेळणी घेणे, घरासाठी आवश्यक वस्तू आणि आवडीचे खाद्यपदार्थ चाखणे, ही अनेक कुटुंबांची वर्षानुवर्षांची परंपरा बनली आहे. यात्रेतील विविध दुकाने ग्रामीण आणि शहरी जीवनातील खरेदी-विक्रीच्या परंपरेची आठवण करून देतात. पूजेचे साहित्य, फुले, नारळ, प्रसाद, सजावटीच्या वस्तू, बांगड्या, कपडे, खेळणी, घरगुती उपयोगाच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ यांची दुकाने यात्रेला बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या माध्यमातून लहान व्यापारी, कारागीर, व्यावसायिक आणि फिरते विक्रेते यांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे.