मुंबई : राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गोंधळामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एकाच वेळी उपस्थिती होती. या नाट्यमय घडामोडींवरून अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सुनावल्याची चर्चा आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्री प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याचवेळी तिथे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीवरून अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सुनावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
बुधवारी देवगिरी निवासस्थानी अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीस सुनेत्रा पवार यांच्यासह तटकरे, पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह काही वरिष्ठ नेते उपस्थित होते. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून आम्हीही त्या बैठकीला उपस्थित राहिलो असे स्पष्टीकरण तटकरे यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही, ही बाब मला आधी सांगणे आवश्यक वाटले नाही का? असा प्रश्न करत सुनेत्रा पवार यांनी तटकरेंना सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले.
...तर सुनेत्रा वहिनींना नक्कीच सांगितले असते : तटकरे
या अंतर्गत वादानंतर अखेर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर जाहीर स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा विषय निघाल्यानंतर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे महायुतीत कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून आम्हीही त्या बैठकीला उपस्थित राहिलो, असे तटकरे म्हणाले. दरम्यान अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली होती, पण आता पूर्णविराम मिळाला. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनीही विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम असल्याचे म्हटले आहे. आता नव्याने ती चर्चा सुरू झालेली नाही, असे तटकरेंनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणविसांनी दिला पार्थ पवारांना शब्द
सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेऊन तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. यानंतर बुधवारी रात्री पार्थ पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत इथून पुढे घटकपक्षातील कोणत्याही नेत्याची भेट घेताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना कळवले जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याबाबत सुनील तटकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी म्हटले की, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, ते संसदेतील खासदार आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांना भेटू शकतात. त्यामध्ये वावगं वाटण्याचं कारण नाही. ते प्रशासकीय कामासोबत संघटनेच्या कामाची चर्चा करत असले तरी वेगळं वाटण्याचं कारण नाही, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.