छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या धर्तीवर शहरातही भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार असून, रामभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. बीड बायपास परिसरात उभारण्यात येणारे हे मंदिर अयोध्येतील मंदिराची छोटी पण हुबेहूब प्रतिकृती असणार आहे.
मंदिर कोण उभारत आहे?
डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने श्रीराम इन्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दमाणी वैद्यकीय महाविद्यालय परिसर, ठिकाण : बीड बायपासजवळ, मूर्तिजापूर परिसर, एकूण प्रकल्प क्षेत्र : सुमारे ३५ एकर मंदिरासाठी राखीव जागा : सुमारे १ एकर अंदाजे मंदिर बांधकाम, क्षेत्र : २५,००० ते ३०,००० चौरस फूट बांधकाम, कालावधी : अंदाजे ३ ते ४ वर्षे बांधकाम साहित्य : राजस्थानमधील मकराना मार्बल वास्तुशैली : पारंपरिक नागर शैली डिझाईन अयोध्येतील मंदिराचे प्रमुख वास्तुकार आशिष सोमपुरा यांच्याकडून खांब व नक्षीकाम : अयोध्येतील मंदिरासारखेच सूक्ष्म कोरीव काम विशेष वैशिष्ट्य : भाविकांना अयोध्येतील मंदिरासमोर उभे असल्याचा अनुभव देणारी रचना.
रामनवमीला होणार शिलान्यास
डॉ. हेडगेवार रुग्णालय, बीड बायपास येथील नवीन वास्तू उभारली जात आहे. या ठिकाणी अयोध्या मंदिराची प्रतिकृती असणारे मंदिर बांधले जाणार आहे. येत्या २६ मार्च रोजी रामनवमीला या मंदिरात पूजा आणि शिलान्यास समारंभ होईल. सकाळी ९.३० वाजता आयोजित या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, कोअर कमिटीचे अध्यक्ष अशोक गोयल, नरेश सराफ यांनी केले आहे. या मंदिरासाठी विशेष शिळा शहरात आल्या आहेत. त्यातील एका शिळेचे सायंकाळी हेडगेवार रुग्णालयात धन्वंतरी देवतेसमोर विधिवत पूजन करण्यात आले.












