नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी पडझड झाली आहे. सोन्याचे दर १० हजार रुपयांहून अधिक घसरलेत, तर चांदीच्या किमतीत जवळपास २० हजार रुपयांची घट झाली आहे. विशेष म्हणजे, भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू होत असतानाच सोन्या-चांदीच्या दरात ही घसरण झाली आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यानं सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव निर्माण झाल्याचं मानलं जात आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या () आकडेवारीनुसार, १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम जवळपास ११ हजार रुपयांची घसरण झाली आहे.
१६ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३४ हजार ३८० रुपये होता. मात्र, आता तो घसरून १ लाख २३ हजार ५८४ रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १३ हजार २०३ रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ९२ हजार ६८८ रुपयांवर आला आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही मोठी पडझड
दरम्यान १६ नोव्हेंबर रोजी भारतीय सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर १ लाख ६९ हजार २८० रुपये होता. आता हा दर घसरून १ लाख ५० हजार ६५० रुपये प्रति किलो झाला आहे. म्हणजेच, अवघ्या एका आठवड्यात चांदीच्या दरात जवळपास २० हजार रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी किमतीशी तुलना केली, तर त्यात मोठी घसरण झाल्याचं दिसतं. जानेवारी महिन्यात सोन्याने प्रति १० ग्रॅम १ लाख ९३ हजार रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण झाली. सध्या १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख २३ हजार रुपयांच्या आसपास आला आहे. म्हणजेच, जानेवारीतील उच्चांकी दराच्या तुलनेत सोने जवळपास ७० हजार रुपयांनी स्वस्त झालंय.
चांदीच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. जानेवारीमध्ये एक किलो चांदीचा दर ४ लाख २० हजार रुपये होता. आता तो घसरून १ लाख ५० हजार रुपयांवर आला आहे. म्हणजेच, उच्चांकी स्तराच्या तुलनेत चांदीच्या दरात तब्बल २ लाख ७० हजार रुपयांची घट झाली आहे.
सोन्या-चांदीच्या किमती घसरण्यामागे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचा आगामी व्याजदरविषयक निर्णय हे प्रमुख कारण मानलं जात आहे. डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वाढ ५० बेसिस पॉइंट्सपर्यंत असू शकते. असं झाल्यास अमेरिकी डॉलर आणि ट्रेझरी बॉण्ड्समधील गुंतवणूक अधिक आकर्षक ठरू शकते. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्या-चांदीमधील गुंतवणूक काढून इतर पर्यायांकडे वळत आहेत. परिणामी, या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण होत आहे. याशिवाय, कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने प्रति बॅरल ९० डॉलरच्या वर असल्यानं महागाईचा दबावही वाढला आहे. त्याचाही परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत आहे.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर आता गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे की, किमती आणखी खाली जाणार की पुन्हा वाढ सुरू होणार? काही तज्ज्ञांच्या मते, सोनं अगदी नीचांकी स्तरावर पोहोचलं आहे. त्यांच्या अंदाजानुसार, सोन्याचा संभाव्य तळ प्रति १० ग्रॅम १ लाख १५ हजार ते १ लाख ३० हजार रुपयांच्या दरम्यान असू शकतो.
बाजारातील जाणकारांच्या मते, सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्यास गुंतवणूकदारांनी एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं गुंतवणूक करावी. दुसरीकडे, गोल्डमन सॅक्सच्या मते, अल्पकालावधीत सोन्याच्या किमती आणखी घसरू शकतात. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीनं सोनं आणि चांदी खरेदी केल्यास चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.