राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? ५ मंत्री बदलणार अजितदादांची राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आक्रमक , राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या पुन्हा हालचाली !

Foto
मुंबई : राज्यात रविवारी अचानक राजकीय खलबते सुरू झाली. राजकीय वर्तुळातून आताच्या घडीला एक अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मध्यंतरी चर्चा थंडबस्त्यात गेली होती. पण आता या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत असून राष्ट्रवादीच्या पाच मंत्र्यांमध्ये बदल, होत असल्याचे सांगण्यात येत असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्थ खात्यासाठी आग्रह धरला आहे. 

 या विषयी माध्यामतील बातम्यांनुसार दोन्ही राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  त्यानुसार  दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा यामध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी सुद्धा अशा चर्चा झाल्याच्या वार्ता आल्यात. पण दोन्ही काँग्रेसकडून सातत्याने त्याचा इनकार करण्यात आला आहे. आता विलिनीकरणाच्या चर्चेत किती तथ्य आहे हे लवकरच समोर येईल.

यापूर्वीच्या चर्चा वांझोट्या
अजितदादा हयात असताना दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न झाले. बैठक झाली असा दावा शरद पवार गटाने केला होता. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी हा दावा फेटाळला होता. त्यानंतर राज्यात अनेकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सातत्याने चर्चा झाली. पण या चर्चा वांझोट्या ठरल्या. त्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या खेळीशिवाय काहीएक हाती लागले नाही. भाजपसोबत राहायचे, जायचे की आघाडीसोबत घरोबा करायचा असे अनेक अंडरकरंट या संवाद-विसंवादातून समोर आले.

विलिनीकरणाची चर्चा बंद
दरम्यान नुकतीच मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर आज अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात अर्थखाते देण्याबाबत फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे भुजबळांनी सांगितले. तर याचवेळी त्यांनी विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद झाल्याचा दावा केला आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुद्धा विलिनीकरणाच्या चर्चेवर पडदा पडल्याचा दावा केला होता. पण दोन दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावर अशी कुठलीही चर्चा झालेला नाही असे भुजबळ म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय झाले ? 
दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत  अर्थखात्याच्या मागणीवर राष्ट्रवादीचे नेते ठाम असून याचदरम्यान राष्ट्रवादीकडून ५ मंत्री बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्तुळात राजकीय घडोमोडी वाढल्या आहेत. दादांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज ९ वाजता बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सर्व वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले.