दोन बालके बचावली, पिकअप चालक फरार
पैठण, (प्रतिनिधी) : बिडकीन येथील पाच जणांचा गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ताजी असतानाच रविवारी डोणगाव चौंढाळा रस्त्यावर पिकप दुचाकी वाहनात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.२१) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पाचोड येथून आठवडी बाजार करून दुचाकीवर चौंडाळा येथील पारधी वस्ती कडे परतणाऱ्या चव्हाण कुटुंबावर काळाने घाला घातला. त्यांच्या दुचाकी वाहनाला काळ रुपी (एम एच, १७ के ९० ७७) या भरधाव पिकपने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. सिद्धार्थ चव्हाण (वय ३०), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय २७), अव्हान्या चव्हाण या जणांचा जागीच मृत्यू झाला. दोन बालकांसह तिघे जण गंभीर जखमी झाले. या जखमींना पाचोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी बाबासाहेब घुगे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार केले. परंतु रंजना अभिषेक चव्हाण याची प्रकृती गंभीर असल्याने दोन बालकासह संजनाला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना केले असता रस्त्यातच संजना चव्हाणचा मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी वाहनावर बसलेले दोन बालके उडून लांब फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात घडताच पिकप चालक घटनास्थळापासून पसार झाला.













