करोडीत ट्रकने तरूणाला चिरडले

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी परिक्षा देणार्‍याने घाईघाईत ट्रक मागे घेतला. त्याचवेळी पाठीमागे उभा ३० वर्षीय तरूण चाकाखाली सापडून ठार झाला. ही घटना १० मार्च रोजी करोडी येथील आरटीओ कार्यालयात घडली.
सोमनाथ आत्माराम काकडे (३०, रा. बडखा, पोस्ट बरझडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र पारसनाथ धनाड (३६, रा. पालखेडा, ता. वैजापूर) हा चालक आपला १२ टायरी ट्रक (एमएच १८, बीए-८०१७) घेऊन करोडी येथील आरटीओ कार्यालयात आला होता. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एटीएस फिटनेस सेंटरजवळ चालक आपला ट्रकमागे घेत होता. याच वेळी सोमनाथ काकडे हे ट्रकच्या डाव्या बाजूला उभे असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही आणि ते थेट ट्रकच्या अवजड चाकाखाली सापडले. या अपघातात सोमनाथ गंभीररीत्या चिरडले गेले. आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यांनी तातडीने धाव घेत त्यांना जखमी अवस्थेत सुरुवातीला बजाजनगरातील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना शहरातील दुसर्‍या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान दुपारी चार वाजेच्या सुमारास सोमनाथ यांचा मृत्यू झाला.