उच्चत्तम कृ.उ.बा. समितीत गुलकंद बर्फीचा खेळ

Foto
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने जिन्सी येथे १९६२ मध्ये ३१९८३ चौ.मि. जागा खरेदी केली होती. वेळोवेळी या जागेची विक्री करत आता १५,६४५ चौ. मि. जागा शिल्लक राहिली. १९८६ मध्ये ही जागा प्रेमचंद फुलपगर यांना विक्री केली होती. परंतु फुलपगर यांनी वेळेत पैसे न भरल्यामुळे त्यांनी भरलेली दहा टक्के अनामत रक्कम जप्त करत हा व्यवहार रद्द केला होता. त्यानंतर २०१२ मध्ये संचालक मंडळाने ही जागा कायम विक्री करण्यासाठी शासनाकडे कलम १२/१ नुसार प्रस्ताव पाठवून अटीवर जमीन विक्रीची मान्यता मिळविली होती. तद्नंतर फुलपगर व इतरांकडून जागेच्या विक्रीबाबत खटले सुरू झाले आणि जागा विक्रीचा प्रस्ताव रखडला गेला.
पठाडेंच्या कारकीर्दीत जमीन विक्रीच्या हालचाली 
५ ऑगस्ट २०१५ रोजी राधाकिशन पठाडे कृउबाचे सभापती झाले व त्याचे संचालक मंडळ आले. या संचालक मंडळाने या जागेची किंमत २१ कोटी ठरवून विक्रीसाठी निविदा काढली. तशा जाहिराती राज्य व जिल्हा पातळीवरील दैनिकांत देण्यात आल्या. तेव्हा सुद्धा सर्वाधिक २१.७१ कोटींची निविदा आली होती. परंतु संचालक मंडळातील काही सदस्यांनी या जागेची विक्री करण्यास विरोध केला व त्यानुषंगाने मा. मंत्री सहकार पणन मंत्र्यांकडून जागेच्या विक्रीला स्थगिती आदेश मिळविला. यानंतर हा स्थगिती आदेश ३ ऑगस्ट २०१७ ला मंत्री महोदयाकडून उठविण्यात आला. स्थगिती उठविल्यानंतर बाजार समितीच्या १३ जानेवारी २०१८ ला झालेल्या मासिक सभेत ऐनवेळी  ठराव क्रमांक १ नुसार सिटी सर्वे नंबर ९२३३ मधील जमीन विक्रीची कारवाई रद्द करण्यात आली.
जमीन विक्री रद्द ठरावामुळे संचालक मंडळ बेचैन 
काही संचालकांचा विरोध असल्यामुळे तसेच मंत्रालयातील स्थगिती, वाद-विवाद यामुळे १३ जानेवारी २०१८ च्या मासिक सभेत या जमिनीची विक्री रद्द करण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. परंतु काही संचालकांना ही बाब खटकली आणि ही जागा विकून आपले उखळ कसे पांढरे करता येईल यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करू लागले. अंदाजे १०० कोटींच्या या जमिनीला अवघ्या २१.७५ कोटीमध्ये खरेदी करण्यासाठी खरेदीदार गोंडा घोळत होते आणि यासाठी सर्वकाही करण्याची त्यांची तयारी होती.  दरम्यान या जागेचेही भाव वाढत होते. रेडीरेकनरचेही दर प्रतिवर्ष वाढत असल्याने या जागेचे शासकीय मूल्य ४० कोटींच्या घरांपर्यंत गेले होते. मग मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाकडून या जागेचे मूल्यांकन कमी करून आखण्यासाठी लॉबिंग करण्यात आली.
त्याअन्वये १ सप्टेंबर २०१८ ला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाने नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सह दुय्यम निबंधक वर्ग-२ अधिकार्‍याला पत्र देऊन जिन्सी येथील या जमिनीच्या मूल्यांकन दाखल्याबाबत विचारणा केली होती. त्यानुषंगाने मुद्रांक व शुल्क विभागाने १ सप्टेंबर २०१९ ला पत्र क्रमांक १०००/२०१८ अन्वये या जागेचे प्रति चौ.मि. २२ हजार प्रमाणे २७ कोटी ५३ लाख ५२ हजार मूल्य असल्याचे सचिव कृषी उत्पन्न बाजार समितीला कळविण्यात आले. 
जागेचे शासकीय मूल्यांकन जास्त आल्यामुळे व संचालक मंडळाला ही जमीन २१ कोटी  ७५ लाखाला विक्री करायची असल्यामुळे शासकीय मूल्यांकन कमी येणे गरजेचे होते. त्यानुषंगाने उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाने पुन्हा मुद्रांक नोंदणी शुल्क अधिकार्‍यांना २८ सप्टेंबर २०१८ ला पत्र देऊन मूल्यांकन दाखला मिळण्याबाबत विनंती केली होती.  त्यानुसार पत्र क्रमांक १०१२/२०१८ अन्वये याच सिटीसर्वे नंबर ९२३३ मधील १५,६४५ स्क्वेअर मिटर जागेचे मूल्य ४८ कोटी ८६ लाख दाखविले व खाली २० टक्के घसारा म्हणत जागेचे मूल्य १९ कोटी ५५ लाख दाखविले.
घसार्‍याचा जावई शोध 
बांधकाम झालेली बिल्डिंग, मशिनरी, गाडी आदींचा घसारा मूल्य घेतल्याचे ऐकिवात आहे. मुद्रांक नोंदणी व शुल्क अधिकार्‍यांनी खुल्या जागेचा २० टक्के घसारा कोणत्या आधारावर काढला, हे देवच जाणो. ४८ कोटी ८६ लाख मूल्याच्या जमिनीचा २० टक्के घसारा ९ कोटी ७७ लाख होतो. त्यान्वये घसारा वजा करून ४८ कोटी ८६ लाख जागेची किंमत ३९ कोटी ८ लाख रुपये देणे अपेक्षित असतानाही मुद्रांक शुल्क अधिकार्‍यांनी जागेची किंमत १९ कोटी ५५ लाख ही कशी ठरविली, हेही न उलगडणारे कोडे आहे. याचीही चौकशी होणे गरजेचेअसून येथूनच खरा गुलकंद बर्फीचा खेळ सुरू झाला.
उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबादच्या मालकीची जिन्सी येथील सिटी सर्वे नंबर ९२३३ मधील १५६४५ चौ.मि. जागा शासनाचे नियम धाब्यावर बसवत कवडीमोल भावात बिल्डरांच्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंदाजे शंभर कोटी बाजार मूल्य असलेल्या या जागेला फक्त २१.७५ कोटीत विकण्यात आली. विशेष म्हणजे हा गुलकंद बर्फीचा खेळ खेळण्यामध्ये माजी संचालक मंडळ, प्रशासक व प्रशासकीय मंडळींनी एखाद्या सुपर कॉम्प्युटरलाही  लाजवेल अशी कल्पकता दाखवत कोट्यवधीचा मलिदा लाटल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिन्सी येथील जागेचे मुद्रांक व नोंदणी विभागाने १ सप्टेंबर २०१९ ला दिलेले जागेचे मूल्यांकन तर दुसर्‍या छायाचित्रात २८ सप्टेंबर २०१९ ला कमी करून दिलेले मूल्यांकनाचे पत्र.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker