औरंगाबाद – ऑल इंडिया मजलीस इत्तेहाद-ऊल-मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सय्यद मतीन यांनी मागील तीन वर्षात पक्षाला अडचणीत आणणारी विधाने केली आहेत. पक्षाचे आदेश न पाळणे आणि पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात वर्तणूक करण्याच्या आरोपावरुन एमआयएमचे वार्ड क्रमांक २० जयभीमनगर-आसेफिया कॉलनीचे नगरसेवक सय्यद मतीन रशिद यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल साजीद बिल्डर यांनी मतीन यांच्या हकालपट्टीचे पत्र जारी केले आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला मतीन यांनी विरोध केला होता. त्यामुळे नगरसेवकांनी सभागृहातच त्यांना चोप दिला होता. एमआयएमच्या शहर जिल्हाध्यक्षांनी जारी केलेल्या पत्रानुसार सय्यद मतीन यांना ८ फेब्रुवारी २०१६, २० ऑगस्ट २०१७, १८ आॉगस्ट २०१८ अशा तीन नोटीस बजावण्यात आल्या होत्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असद उद्दीन ओवेसी यांच्या आदेशाने मतीन यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे साजीद बिल्डर यांनी पत्रात म्हटलेे आहेे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसह धुळे आणि अहमदनगर निवडणुकीच्या प्रचारात पक्षाचा आदेश असतानाही ते उपस्थित झाले नाही आणि पक्षाचा प्रचार केला नसल्याचाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
वादग्रस्त मतीन यांचे कारनामे
-
सय्यद मतीन हे एमआयएमचे तरुण आणि
वादग्रस्त नगरसेवर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी सभागृहात वंदेमातरम म्हणण्यास
विरोध केला होता. त्यानंतर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी
भाजप आणि शिवसेनेने शासनाला पाठवला होता. याला एमआयएमकडून विरोध झाला होता. यावेळी
पक्ष त्यांच्यासोबत होता.
-
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
यांचे निधन झाल्यानंतर औरंगाबाद महापालिकेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
होती. यावेळी सय्यद मतीन यांनी जी व्यक्ती बाबरी मशिद पाडण्यासाठी जबाबदार आहे
त्यांच्या श्रद्धांजलीचा मी विरोध करतो, असे म्हणत श्रद्धांजलीच्या ठरावाला विरोध
केला होता. यावेळी पक्षाने हा मतीन यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत अंग
काढून घेतले होते.
-
वाजपेयींच्या श्रद्धांजलीस विरोध
करणाऱ्या मतीन यांना महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभेत प्रवेशापासून
रोखले आहे. ऑगस्टपासून त्यांना सभागृहात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.










