लग्‍नाच्या तिसर्‍याच दिवशी अपहरण करून नवविवाहितेवर बलात्कार; वैजापूर तालुक्यातील धक्‍कादायक घटना; घटनेनंतर आरोपी फरार

Foto

औरंगाबाद: लग्‍न होऊन तिसर्‍या दिवशी माहेरी आलेल्या 19 वर्षीय नवविवाहितेला फरफटत नेत तिचे अपहरण केले व निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथे घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.

  अप्पा मधुकर माकोडे (वय 25 वर्षे, रा. डागपिंपळगाव) असे बलात्कार करणार्‍या नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचिता (काल्पनिक नाव) हिचे 14 मे रोजी परिसरातीलच एका गावातील तरुणासोबत मोठ्या थाटामाटात लग्‍न झाले होते. डागपिंपळगाव येथे विवाह समारंभ संपवून नवरी सासरी गेली होती. सासरहून हळद उतरविण्यासाठी ती 16 मे रोजी माहेरी डागपिंपळगाव येथे परत आली. त्या दिवशी घरात धार्मिक विधी करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपी अप्पा माकोडे याने सुचिताला फोन केला. तू माझ्यासोबतबोलण्यासाठी घराबाहेर ये, नाही तर झोपलेल्या तुझ्या आई-वडिलांच्या डोक्यात दगड घालून जिवे मारीन, अशी धमकी अप्पाने दिली. भेदरलेली सुचिता स्वतःला सावरत अप्पा माकोडेशी बोलण्यासाठी घराबाहेर आली. 

चल, आपल्याला बोलायचे आहे. गाडीवर बस, असे म्हणताच पीडिता घाबरली. तिने अप्पाच्या गाडीवर बसण्यास विरोध केला. मात्र, अप्पा माकोडेने बळजबरी करत फरफटत सुचिताला आपल्या गाडीवर बसवून येवल्याच्या दिशेने घेऊन गेला. येवल्याच्या नजीक रस्त्याच्या कडेला आडरानात दुचाकी थांबवून सुचिताला गाडीच्या खाली उतरून रस्त्याच्या कडेला सुचितावर बळजबरीने बलात्कार केला. त्याच स्थितीत आरोपीने सुचिताला येवल्याजवळ सोडून पोबारा केला. कसेबसे सावरत भेदरलेल्या स्थितीत सुचिताने येवला येथील पोलिस ठाणे गाठले. घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत पीडिताच्या आई-वडिलांना फोन करून बोलावून घेतले. नातेवाईकांनी सुचिताला घेऊन वीरगाव पोलिस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य ओळखत उपविभागीय पोलिस अधिकारी पवार हे स्वत: तपास करत आहेत. या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

नराधमास कडक शिक्षा व्हावी 
माझ्या लग्‍नाच्या तिसर्‍या दिवशी माझ्या जीवनात असा दुर्दैवी प्रसंग घडला. माझी अब्रू लुटणार्‍या नराधमास कडक शिक्षा व्हावी.
-पीडित विवाहिता